पुणे : कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर

मोहिनी मोहिते
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

केंद्र सरकारने बुधवारी सर्व कँटोन्मेंट बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ ५ ऑगस्टपर्यंत वाढविला असून, कॅन्टोन्मेंटच्या  निवडणुकाही सहा महिन्यांसाठी लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे पुणे, खडकीसह देशभरातील ५५ कँटोन्मेंट बोर्डांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : केंद्र सरकारने बुधवारी सर्व कँटोन्मेंट बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ ५ ऑगस्टपर्यंत वाढविला असून, कॅन्टोन्मेंटच्या  निवडणुकाही सहा महिन्यांसाठी लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे पुणे, खडकीसह देशभरातील ५५ कँटोन्मेंट बोर्डांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने बुधवारी लष्कराच्या चारही मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील अधिसूचना पाठवली आहे. ‘प्रशासकीय कारणा’स्तव कँटोन्मेंटच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने ५५ कँटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

पुणे, खडकी कँटोन्मेंट बोर्डासह ५५ कँटोन्मेंटचा पंचवार्षिक कार्यकाळ १० फेब्रुवारी रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने निवडणुकीच्या तयारीसाठी या कँटोन्मेंट बोर्डांना वॉर्ड आरक्षण प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे व खडकी कँटोन्मेंट बोर्डांनी अनुसूचित जातीजमाती व महिलांसाठी वॉर्ड आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून, त्याचा प्रस्ताव मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाकडे पाठविला होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय स्तरावरून निवडणुकीच्या हालचाली थंडावल्या गेल्या. कँटोन्मेंट बोर्डांचा पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ४५ दिवस आधी निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे अपेक्षित आहे.

भारतीय कलाकारांना नाचवून तो भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

यावेळी पुणे, खडकीसह ५५ कँटोन्मेंट बोर्डांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असतानाच, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ५५ कँटोन्मेंट बोर्डांच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवल्याचे जाहीर केले आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया'

निवडणुका ऑगस्टमध्ये की पुन्हा मुदतवाढ मिळणार ?
कँटोन्मेंट कायदा २००६ च्या कलम १४ नुसार, केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करून, कँटोन्मेंट बोर्डाचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढविला आहे. त्यामुळे कँटोन्मेंटच्या निवडणुका आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने, त्या वेळी निवडणुका होणार की पुन्हा सर्व कँटोन्मेंट बोर्डांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळून, डिसेंबरपर्यंत निवडणुका लांबणार, याची चर्चा कँटोन्मेंट परिसरात सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Cantonment elections extended for six months