CountDown Start's : चांदणी चौक परिसरातील दोनशे मीटरचा परिसर निर्मनुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandani Chauk

CountDown Start's : चांदणी चौक परिसरातील दोनशे मीटरचा परिसर निर्मनुष्य

पुणे : पूल पाडण्यापूर्वी दोनशे मीटरचा परिसर सायंकाळी सहा वाजता निर्मनुष्य करण्यात येत आहे. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला करण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. त्यासाठी अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच, नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये. तसेच, पोलिसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा: Pune News : 'या' 9 कारणांसाठी चांदणी चौकातील पुलाला धन्यवाद म्हटलंच पाहिजे

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जुना पूल पाडण्याच्या कामाची माहिती घेतली. त्यांच्यासमवेत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे, ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी ‘एनएचएआय’ने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलिस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिले.

हेही वाचा: Pune : चांदणी चौकातील पूल आज कोसळणार; तत्पूर्वी पुणेकरांसाठी सूचनांचा महापूर

असा पाडणार जूना पूल

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिलिमीटर व्यासाचे १ हजार ३०० छिद्रे पाडण्यात आली आहेत. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ‘ब्लास्ट एक्स्पर्ट’ आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (ता.२) पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.

पूल पाडताना त्याचे तुकडे आणि धूळ परिसरात उडू नये, यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, पाचशे वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. दोनशे मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Video : ...अन् भर सभेत अजित पवारांनी सुरूवात केली गाण्याला

पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशिन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बंदोबस्तासाठी ४२७ पोलिस कर्मचारी

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे ३ पोलिस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, ४६ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलिस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलिस अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.