Chandani Chowk : उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात डावलल्याने भाजपा मधील वाद चव्हाट्यावर

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होत असताना त्याच्या आदल्याचे दिवशी भाजपमधील गटबाजी उफाळून आलेली आहे.
medha kulkarni and chandrakant patil
medha kulkarni and chandrakant patilsakal

पुणे - चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होत असताना त्याच्या आदल्याचे दिवशी भाजपमधील गटबाजी उफाळून आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केली. तसेच कोथरूडचे सध्याचे आधुनिक नेते यांनी चांदणी चौकाच्या विषयात काही केलेले नाही अशी नाव न घेता अप्रत्यक्षपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

गेल्या पाच वर्षापासून चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू होते. हा उड्डाणपुल व्हावा यासाठी मेधा कुलकर्णी यांनी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत. २०१९ ला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून कुलकर्णी यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना वारंवार पक्षाच्या नेत्यांकडून डावले जात आहे अशी चर्चा होती. कुलकर्णी या सध्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना देखील मतदारसंघात त्यांना विश्वासात घेतले जात नाही.

भाजप तर्फे चांदणी चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पत्रक छापण्यात आले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी यांचा फोटो आहे. पण यात कुलकर्णी यांना स्थान देण्यात आलेले नाही. अखेर कुलकर्णी यांनी खदखद व्यक्त करत टीका केली.

अशी आहे मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट

'असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे'

माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला".

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.

गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com