महावितरणच्या 'गो ग्रीन' योजनेत पुणेकरांचा 'नंबर वन'!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

महावितरणकडून 'गो-ग्रीन' योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' आणि 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे.

पुणे : महावितरणने वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून त्याऐवजी सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला सर्वधिक पसंती पुणेकरांनी दिले आहे. राज्यभरातील 1,79,587 ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक म्हणजे 43,974 वीजग्राहकांचा समावेश आहे. 

दरम्यान, गेल्या सात महिन्यांत 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पुणे परिमंडलात तब्बल 18,999 ग्राहकांची वाढ झाली आहे. याच कालावधीत एकूण 16 परिमंडलांमध्ये 'गो-ग्रीन' योजनेत 75,669 ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. त्यात पुणेकरांचा वाटा देखील सर्वाधिक आहे. महावितरणची पर्यावरणपुरक 'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे. 

'मी अर्णब गोस्वामींचा चॅनेल पाहत नाही पण...'; काय म्हणाले न्यायमूर्ती चंद्रचूड?

महावितरणकडून 'गो-ग्रीन' योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' आणि 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच 'ई-मेल' तसेच 'एसएमएस'द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तात्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल.

अभिमानास्पद! पुणे विद्यापीठातील ८ शास्त्रज्ञांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं मानांकन

सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्‍यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. 

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील 24,696 तर पिंपरी चिंचवड शहरातील 12,779 तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि वेल्हे तालुक्‍यातील 6499 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती दिली आहे आणि पर्यावरणपूरक कामात योगदान दिले आहे. 

'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

असा निवडता येईल गो ग्रीनचा पर्याय 
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens given highest priority to Go Green scheme of MSEDCL