डी-मार्ट बंद होण्याच्या अफवेने नागरिकांची तारांबळ; खरेदीसाठी उसळली गर्दी

D-Mart-Baner
D-Mart-Baner

बालेवाडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालये, तसेच शासकीय कार्यालये, संस्था, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, स्विमिंग पूल तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

कोरोनाबाबतच्या अनेक उलटसुलट गोष्टी सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अशीच एक बातमी व्हायरल झाल्याने पुणेकरांनी खरेदीसाठी रांगाच रांगा लावल्याचे चित्र रविवारी (ता.१५) पाहावयास मिळाले. चीनमधील 'वूहान' या शहरात निर्माण झालेली परिस्थिती पुण्यात उद्भवली, तर कसे होणार या भीतीने लोकांची गाळण उडाली होती.

घरात अन्नधान्याचा मुबलक साठा करून ठेवावा, यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून डी-मार्टसारख्या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉलमध्ये किंवा गर्दी निर्माण होईल, अशा इतर ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, याला तिलांजली देत रविवारी पुणेकरांनी डी-मार्टबाहेर रांगा लावल्या.

दरम्यान, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांनी दिवसभर घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. मात्र, सायंकाळच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकाने, मेडिकल आणि मॉलमध्ये गर्दी केली होती. यावेळी अन्नधान्य, पॅकेजमधील खाद्यपदार्थ, डेटॉल, हँडवॉश, सॅनिटायझर, शॅम्पू या वस्तू खरेदी करण्यावर नागरिकांचा विशेष भर होता. 

बाणेर येथील डी-मार्ट बाहेर सुमारे शंभर मीटर अंतराएवढ्या रांगा लावत नागरिक खरेदी करत होते. मात्र, कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती या नागरिकांच्या संपर्कात आल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव नागरिकांना नाही. त्याचे आपल्या कुटुंबालाही परिणाम भोगावे लागतील याची जाणीव नाही. त्यामुळे काही नागरिकांनी याबाबत नाराजी दर्शविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com