esakal | शाळा सुरू करण्यास परवानगी, पण...;जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Students_School

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरकारी केंद्रातून 22 नोव्हेंबरदरम्यान कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य राहील. 

शाळा सुरू करण्यास परवानगी, पण...;जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या सर्व सरकारी, खासगी शाळा आणि वसतिगृहे येत्या सोमवार (ता. 23) पासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पालकांच्या संमतीवर अवलंबून राहील. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पालकांची लेखी संमतीनंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...​

शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेत थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध करून द्यावे. मास्कचा वापर बंधनकारक राहील. शाळा वाहतूक बस, रिक्षा आणि इतर सुविधांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी यानुसार नावानिशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरकारी केंद्रातून 22 नोव्हेंबरदरम्यान कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य राहील. 

सत्ता हाती घेताच चीनला नियम पाळायला लावू; बायडेन ट्रम्प यांचाही निर्णय बदलणार​

तसेच, आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा आणि गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध राहतील. वृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी आणि औषधोपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी. त्यांनी शक्‍यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात, यासह इतर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनानं कसली कंबर; विशेष उपाययोजनांवर भर!​

शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांची जबाबदारी- 
- शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी 
- एखाद्या शाळेत क्वारंन्टाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर स्थलांतरीत करून निर्जंतुकीकरण करावे. 
- क्वारंटाईन सेंटर स्थलांतरीत करणे शक्‍य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

अशी राहील बैठक व्यवस्था : 
- एका बाकावर एकच विद्यार्थी, शारीरिक अंतराच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी चिन्हे करावीत. 
- शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापर करण्याबाबत स्टीकर्स लावावेत 
- थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. 
- शाळेच्या परिसरात रांगेत उभे राहण्यासाठी किमान सहा फूट शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता चौकोन, वर्तुळाचा वापर करावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image