पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे रुग्णाचा रस्त्यात मृत्यू

Oxygen Bed
Oxygen Bed

वडगाव शेरी (पुणे) : शहरातील एकाही रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. याचा फटका सामान्य लोकांना बसत असून ज्येष्ठ महिला रुग्णाला उपचारा अभावी रस्त्यावरच प्राण सोडावा लागल्याची घटना नगर रस्त्यावर घडली आहे. ऑक्सिजन बेडच्या शोधासाठी ज्येष्ठ महिलेच्या नातेवाईकांनी रात्रभर पुणे शहरातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात चकरा मारूनही बेड उपलब्ध झाले नाही. नगररोड वरील रामवाडी गावातील अरुलमेरी ऍन्थोनी(वय 73)  यांना काल (दि. 1) रोजी कोरोनाची लागण झाली असल्याचे कळाले. 'ऑक्सिजनची लेवल कमी झाली आहे. तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल' असे सांगत रात्री आठ वाजता येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील कोरोना सेंटर मधील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन बेडसाठी रुग्णाला ससूनला पाठवले. ससूनमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या बाहेर बेडची वाट पहावी लागली. त्यानंतर रुग्णाला जम्बो कोविड रुग्णालयामध्ये नेण्यात आले. जम्बो रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी हेल्पलाईनवर माहिती द्या. हेल्पलाईनच्या समृपदेशकांनी  सांगितल्यानंतर आम्ही बेड देऊ असे सांगितले. 

कोविड हेल्पलाईनचा नंबर दीड तास व्यस्त होता. दीड तासानंतर समुपदेशकांनी माहिती घेतली. तुम्हाला पाच मिनीटांमध्ये रुग्णालय कळवतो असे सांगितले. त्यानंतर हेल्पलाईन वरून शेवटपर्यंत कोणताही निरोप आला नाही. कोविड हेल्पलाईनवरील डॅशबोर्ड मध्ये अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि वेंटिलेटर बेड उपलब्ध असे दाखवत होते. पण, रुग्णालयामध्ये गेल्यावर बेडच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. आईला बेड मिळावा यासाठी त्यांच्या मुलांनी शहरातील सर्व रुग्णालयामध्ये जाऊन बेडची चौकशी केली. पण रुग्णालयामध्ये बेड नसल्याचे सांगितले जात होते. 

शहरातील रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याने नगररोड वरील रुग्णालयात मुले आईला घेऊन गेले. मात्र, तेथेही बेड उपलब्ध नसल्याने, रुग्णालयाच्या बाहेरून त्यांना परत पाठवले. अखेर, सकाळी खराडी बायपास रोडला रस्त्यामध्येच ऑक्सिजन कमी झाल्याने आईचा गाडीतच मृत्यू झाला. याबाबत ज्येष्ठ महिलेचा मुलगा आरकीदास ऍन्थोनी म्हणाले, कोरोनामुळे आईला ऑक्सिजन बेडची गरज होती. कोविड हेल्पलाईन सतत व्यस्त होती. शहरातील सर्व रुग्णालयामध्ये जाऊन आलो. पण, बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालयात दाखल करून घेत नव्हते. ऑक्सिजनची गरज असल्याने आईला पोर्टेबल ऑक्सिजन बॉटलने ऑक्सिजनचा पुरवठा केला. पण सकाळी ऑक्सिजनची मात्रा खुपच कमी झाली. माझी आई उपचाराविना रस्त्यामध्ये गेली. पालिकेच्या हेल्पलाईनवरून काहीच मदत मिळाली नाही. प्रशासन सांगते ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये एकही बेड उपलब्ध नाही. जम्बो कोविड आणि ससून मध्ये रुग्णालयामध्ये जागा मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com