चायनीज मांजाविरोधात धडक कारवाई; पुण्यात दुकानदारांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

बंदी असताना देखील चायनीज नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे वारंवार आढळून येत आहे. त्याचा वापरामुळे अनेक नागरिकांनी तसेच पक्ष्यांनी जीव गमावला आहे.

पुणे : पतंगाला वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. नाना पेठ, खडकी आणि येरवडा परिसरातील दुकानांवर कारवाई करीत एका महिलेस तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

बंदी असताना देखील चायनीज नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे वारंवार आढळून येत आहे. त्याचा वापरामुळे अनेक नागरिकांनी तसेच पक्ष्यांनी जीव गमावला आहे. संक्रांतीच्या दिवशी या मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत असताना पोलिस कर्मचारी सचिन ढवळे आणि विशाल शिर्के यांना खडकी आणि येरवडा भागात नायलॉनचा मांजा विक्री केला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार खडकीत अशरफ आदिफ तांबोळी (रा. जुना बाजार) आणि येरवडा भागात नाझनीन अमीन पटेल (रा.जनतानगर, येरवडा) हे सणासुदीच्या काळात मांजा विक्री करताना आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार खडकी आणि येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

खंडणी विरोधी पथकाकडून देखील नायलॉनच्या मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढली जात होती. त्यावेळी पोलिस कर्मचारी प्रदीप शितोळे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने हसनभाई पंतगवाले याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी अयाज मेहबूब शेख (वय 55, रा. न्यू नाना पेठ) यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग आणि सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune crime branch has filed charges against shopkeepers selling Chinese manja