पुण्यात कोरोनाचा हाहाकार; साडेपाच महिन्यांतील आतापर्यंतची उच्चांकी नोंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात आतापर्यंतच्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत गुरुवारी (ता.२७) पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक नोंदला गेला आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल तीन हजार ७०३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ७७३ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ४५९ रूग्ण वाढले आहेत. दरम्यान, २ हजार ८१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील १ हजार १०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६४३, नगरपालिका क्षेत्रातील १४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३३ रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात 'जम्बो' पळवापळवी; ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना केलं जातंय 'हायजॅक'!​ 

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद क्षेत्रातील १२, नगरपालिका ६ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही बुधवार (ता. २६) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवार (ता. २७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ५६ हजार ८४४, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ४०२ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ८७३ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १०७ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 3703 new corona patients found on 27 August 2020