पुणे जिल्हा बँकेसाठी ६५.६८ टक्के मतदान; मंगळवारी मतमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune district bank election
पुणे जिल्हा बँकेसाठी ६५.६८ टक्के मतदान; मंगळवारी मतमोजणी

पुणे जिल्हा बँकेसाठी ६५.६८ टक्के मतदान; मंगळवारी मतमोजणी

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती (Pune District Bank) सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Election) रविवारी (ता. २) कसलाही अनुचित प्रकार न होता, शांततेत ६५.६८ टक्के मतदान (Voting) झाले. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी पुण्यात केली जाणार आहे. मतमोजणनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक ९९.३८ टक्के मतदान आंबेगाव तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १६० पैकी १५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्यातील मतदान करुन घेण्याची जबाबदारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविली होती. आंबेगाव तालुक्यापाठोपाठ बारामती तालुका सर्वाधिक मतदानात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तालुक्यात ९८.१२ टक्के मतदान झाले आहे. येथील ३७३ मतदारांपैकी ३६६ जणांनी मतदान केले आहे. येथील मतदानाची जबाबदारी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती.

येत्या मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पूण्यातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत शिरूर, हवेली आणि मुळशी या तीन तालुका मतदारसंघात मोठी चुरस आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. हवेली तालुका मतदारसंघात बॅंकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के आणि याच पक्षाचे नेते विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मुळशी तालुका मतदारसंघात बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी तरूण कॉंग्रेसचे तरुण नेते सुनील चांदेरे यांच्यात लढत होत आहे. कलाटे हे अपक्ष असून चांदेरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिरूर तालुका मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार, आमदार अशोक पवार विरूद्ध अपक्ष आबासाहेब गव्हाणे निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा: सांगलीच्या कुंडलमधील डॉ.जी.डी.बापू लाड साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट

'क' वर्ग मतदारसंघातही मोठी चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून हवेली तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे भाजपचे उमेदवार आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ पैकी १४ जागा याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. यांची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. उर्वरित ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जागांमध्ये तीन तालुका मतदारसंघ, क आणि ड मतदारसंघाची प्रत्येकी एक आणि महिला राखीव मतदारसंघाच्या दोन जागांचा समावेश आहे.

तालुकानिहाय झालेले मतदान

आंबेगाव - १५९ बारामती-६७२, भोर-१४४, दौंड -१६२, इंदापूर-३४६, जुन्नर-२४६, खेड-१९०, मावळ -११५, मुळशी -८०, पुरंदर -२२०, शिरूर - २७३, वेल्हे - ३४ आणि हवेली - ६५२.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top