शेतजमीन खरेदी करताय; टेन्शन घेऊ नका, आता बँक करणार तुम्हाला मदत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

बारामती तालुक्‍यातील 13 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 99 हजार रुपयांचे, तर दौंड तालुक्‍यातील चार शेतकऱ्यांना 37 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

पुणे : शेतकऱ्यांना पिकांसाठी, शेती अवजारे खरेदी किंवा शेतीसाठी पूरक असलेला जोडधंदा सुरू करण्यासाठी विविध बँका कर्जपुरवठा करतात, हे सर्वज्ञात आहे, पण एखादी बँक चक्क शेजारची जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देतेय, म्हटलं तर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. परंतु, हो हे शक्‍य असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दाखवून दिले आहे. या
बँकेने चक्क शेत जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी नवी योजना चालू आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे.

- 'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'

दरम्यान, गेल्या सात महिन्यात जिल्ह्यातील केवळ बारामती आणि दौंड या दोनच तालुक्‍यांतील 17 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मिळून, त्यांच्या पूर्वीच्या जमिनीच्या शेजारची विक्रीस निघालेली 18 एकर 24 गुंठे जमीन जिल्हा बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून खरेदी केली आहे. यासाठी जिल्हा बँकेने या सर्व शेतकऱ्यांना दोन कोटी 76
लाख 39 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यापैकी बारामती तालुक्‍यातील 13 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 99 हजार रुपयांचे, तर दौंड तालुक्‍यातील चार शेतकऱ्यांना 37 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

- मोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षापासून (2019-20) या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार एप्रिल ते ऑक्‍टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत हे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत
बागायती जमिनीच्या खरेदीसाठी किमान पाच लाख आणि जिरायती जमिनीच्या खरेदीसाठी किमान दोन लाख आणि दोन्ही प्रकारच्या जमीन खरेदीसाठी कमाल 25 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हा बँकेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांनी सांगितले.

- देवेंद्रजी तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं; उद्धव ठाकरेचं प्रत्युत्तर 

राज्यातील एकमेव बँक

राज्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेती अवजारे आणि शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी मध्यम मुदत कर्ज आणि शेतीला पूरक जोडधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी शेजारील
विक्रीस निघालेली जमीन खरेदी करण्यासाठी कोणतीही बँक कर्ज उपलब्ध करून देत नाही. सध्या जमीन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी पुणे ही एकमेव जिल्हा बँक असल्याचे या बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Central Co operative Bank will provide loans to farmers to purchase farm land