आम्ही लढतोय न घाबरता, न डगमगता; सांगतेय कोरोनाशी झुंजणाऱ्या कुटुंबातील एकजण...

covid 19 , coronavirus
covid 19 , coronavirus

पुणे : कोरोना विषाणूंचा फैलाव शहरभर झालाय. कोणाकडून कोणालातरी त्याचा संसर्ग होतो. पण, कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने घाबरण्याचं, लपवण्याचं आणि आपण काही तरी चुक केली असं वाटून घेण्याचं खरंतर काहीच कारण नाही. आम्ही कोरोनाशी न घाबरता, आत्मविश्वासानं लढतोय. तुम्ही ही डगमगू नका... खंबीर रहा... आणि मनाला खंबीर ठेवा... हे तुम्हाला सांगतेय ते कोरोनाशी झुंजणाऱ्या कुटुंबातील एकजण....कसं आणि कुठं विषाणूंचा संसर्ग झाला काहीच कळंल नाही. पण, आईला मधुमेह असल्याने तिला लगेचंच लक्षणं जाणवू लागली. आम्हाला काहीच लक्षण दिसत नव्हती. डॉक्टरांनी आईची टेस्ट केली. ती पॉझीटिव्ह आली. तिच्या संपर्कात असल्याने आमच्या चौकोनी कुटुंबाचीही कोरोना चाचणी केली. त्यात माझी, पतीची आणि मुलीची टेस्ट पॉझीटिव्ह आली. पण, मुलाची दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये केली टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला हे कळताच सुरवातीला खूप घाबरले होते. काय करायचं, कोणाला सांगायचं कळंत नव्हतं. पण, यात सगळ्यात धीर दिला ते महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनी... कोरोनाशी लढणाऱ्या छाया पाटेकर बोलत होत्या. त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती सकारात्मकता आणि आत्मविश्वास. 

टिव्हीवरच्या न्यूज बघून कोरोनाबद्दल प्रचंड भीती मनात बसली होती. त्याचा संसर्ग झाल्यानंतर तो बरा होत नाही. त्यामुळे आता मृत्यू निश्चित झाला, अशी काही मानसिकता आपोआप होते. माझीही तशीच झालेली. आपल्या जवळ कोणीच नसतं. कोणी मदतीसाठी धाऊन येऊ शकत नाही. संपूर्ण कुटुंब घाबरलेलं असतं. अक्षरशः डोकचं चालत नाही काय करायचं ते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला पण, कोणत्याच रुग्णालयात जागा मिळाली नाही. त्यामुळे तातडीने डॉ. नायडू रुग्णालयात फोन केला. त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली. मी इतकी घाबरली होते की, फोनवरही डॉक्टरांशी व्यवस्थित बोलता येत नव्हते. ‘आता मी करू काय’, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘अजिबात घाबरू नका. कोरोना पूर्णतः बरा होतो. ‘ या आश्वासक शब्दांनाचा पहिला ‘डोस‘ आम्हाला मिळाला, असे पाटेकर यांनी सांगितले. 

रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला तपासले. तेथे वैद्यकीय चाचण्या केल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. पण, ताप आला, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला, तर थेट रुग्णालयात दाखल व्हायचे, असेही सांगितले. पण, डॉक्टरांच्या प्रत्येक सूचना तंतोतंत पाळल्या. त्यामुळे आता कोरोनामुक्त होत आहोत. टिव्ही, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप  मेसेज या सगळ्यांवर आपण दिवस-रात्र कोरोनाच बघतो. त्यातून खूप मोठी भीती बसते. ही मनातील भीती आता घालविण्याची गरज आता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com