esakal | पुणे : व्यापारी महासंघाचा सरकारला अल्टिमेटम; दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Traders Association

पुणे : व्यापारी महासंघाचा अल्टिमेटम; दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा...

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : शहरातील व्यापारी महासंघाची आज महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये दुकानं उघडी ठेवण्याच्या वेळांबाबत चर्चा झाली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं व्यापाऱ्यांवर लादलेल्या निर्बंधांविरोधात ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जर दोन दिवसांत योग्य निर्णय झाला नाही तर ४ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्यात येतील असा अल्टिमेटमही व्यापारी महासंघानं सरकारला दिला आहे. अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Pune Federation of Traders gives ultimatum to gov take decision in two days aau85)

हेही वाचा: संयुक्त राष्ट्रांत भारताचा दबदबा; PM मोदी भूषवणार UNSCचं अध्यक्षपद

दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र, आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा यासाठी येत्या मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२.१५ या काळात पुणे शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनानंतर सरकारने दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर बुधवार ४ ऑगस्ट पासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायं. ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील, अशा इशाराही महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. महासंघाच्या सर्व पदाधिका-यांची बैठक ३१ जुलै रोजी पार पडली यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Opinion poll : पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत का? मांडा तुमचं मत

या संदर्भात अधिक माहिती देताना फत्तेचंद रांका म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉकडाऊन असताना सर्वच व्यवसाय डबघाईला आले. या परिस्थितीने आलेल्या नैराश्याने अनेकांनी आत्महत्या देखील केल्या. पहिल्या लाटेतून सावरत असताना दुस-या लाटेदरम्यान ५ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली होती. सरकारने ती मान्य केली नाही. मात्र, तरीही व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने ५ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवत सरकारला मदत केली. असे असून देखील मागील चार महिन्यात पुणे शहरात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना व रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असताना देखील व्यवसायांच्या वेळांमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा निर्णय घेतलेला नाही, ही बाब व्यापा-यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह ‘विकेंड लॉकडाऊन’मधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त ‘जैसे थे’ राहती, असा आदेश काल काढला आहे. हे म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे," असंही रांका यावेळी म्हणाले.

काय आहेत व्यापाऱ्यांच्या मागण्या?

प्रशासनाने सध्या नऊ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, या वेळा व्यापाऱ्यांच्या सोईच्या नाहीत. त्यामुळे पुणे शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तू सोडून) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. अथवा आठवड्यातील ७ दिवस म्हणजे सोमवार ते रविवार सर्व दुकाने (अत्यावश्यक दुकाने सोडून) सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत उघडी ठेवावीत किंवा सर्व दुकाने (अत्यावश्यक दुकाने सोडून) आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे सोमवार ते रविवार उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून व्यापा-यांबरोबर ग्राहकांची देखील सोय होऊ शकेल, या पुणे व्यापारी महासंघाच्या प्रमुख मागण्या असल्याचं रांका यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांच्या काय आहेत अडचणी?

सरकारी, खाजगी कार्यालये, कारखाने सुरू असून सायंकाळी ५ नंतर संचारबंदी असून देखील खाद्य पदार्थांचे स्टॉल व रस्त्यावरील इतर गर्दी मात्र तशीच आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. या उलट नियम पाळत आपला व्यवसाय बंद ठेवणारा व्यापारी मात्र कर्मचा-यांचे पगार, जागेचे भाडे, कर्ज, व्याजाचे हप्ते कर, वीजबिले, घरखर्च या बाबी सांभाळीत आर्थिक संकटात सापडला आहे. या संकट काळात सरकार कडून कोणतीही मदत सोडाच पण सहकार्य देखील मिळत नसल्याने व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे आंदोलनाशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असंही यावेळी रांका यांनी सांगितलं.

loading image
go to top