सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती

Serum_Institute
Serum_Institute

पुणे : सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्रकल्पातील एका इमारतीला गुरुवारी (ता.२१) दुपारी लागलेल्या आगीची सुरूवात ही दुसऱ्या मजल्यावरच लागल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

शुक्रवारी दिवसभर पुणे महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यासह विविध विभागांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत महत्वाची माहिती नोंदविली असून त्याचा संयुक्त अहवालातूनच आगीची कारणे स्पष्ट होणार आहेत. आगीची घटना ही अंतर्गत कारणांमुळेच असण्याची दाट शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

सीरमच्या मांजरी येथील 'एम-एसईझेड-3' या प्रकल्पातील एका इमारतीला गुरूवारी दुपारी आग लागली होती. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी आग कशामुळे लागली, याची पाहणी संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली. त्यामध्ये 'एमआयडीसी' अग्निशामक दलाचे प्रमुख संतोष वारीक, 'पीएमआरडीए' अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे आणि पुणे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह विद्युत विभाग, न्यायवैद्यक विभागांसह अन्य विभागांच्या प्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश होता. 

आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली इमारत ही तळमजल्यासह तीन मजल्यांची आहे. मात्र एका मजल्यावर दोन मजले तयार करण्यात आल्याने संबंधीत इमारत ही पाच मजली असल्याचे बाहेरुन दिसते. गुरूवारी दुपारी लागलेल्या आगीला दुसऱ्या मजल्यापासून सुरूवात झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याच मजल्यावरील दोन पार्टीशनच्या पलिकडेच पाच जणांचे मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना आढळले. दरम्यान, अग्निशामक दलासह विद्युत व न्यायवैद्यक विभागाने देखील घटनास्थळाची पाहणी करून महत्वाची माहिती नोंद केली आहे. 

सीरमच्या विनंतीवरुन अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी मुक्कामी 
सीरममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी रात्री तीन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी ठेवण्यात आली होती. दरम्यान, सीरमकडे अग्निशामक दलाची एकच गाडी असल्याने त्यांच्यावतीने पुणे अग्निशामक दलास त्यांच्याकडील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी ठेवण्याची विनंती पुणे अग्निशामक दलाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, संबंधीत ठिकाणी एक अग्निशामक बंब घटनास्थळी ठेवण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com