esakal | बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. कोरोनाचे नियम पाळत; पण उत्साह कमी न होऊ देता पुण्याची गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याचा निश्चय शहरवासीयांनी केला आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती, अशा दोहोंकडे त्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे.

भरपावसात पुणेकरांनी खरेदीसाठी तसेच बाप्पाला ‘मोरया’च्या जयघोषात घरी नेण्यासाठी गुरुवारी उपनगरांच्या बाजारपेठासह मंडई, तुळशीबाग व बोहरी आळी येथे गर्दी केली होती.

घरगुती गणपतीच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी गेल्या आठवडाभर बाजारपेठेत गर्दी केली होती. सजावटीच्या आणि पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. आदल्या दिवशी या तयारीवर शेवटचा हात फिरवताना राहिलेल्या गोष्टी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु होती. काहींनी मूर्ती खरेदी करण्यासाठीही धाव घेतली होती. कोरोनाचा फटका बसल्याने बजेट कमी झाले असले तरी बाप्पाच्या तयारीत कसर ठेवायची नाही, अशीच भावना बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

सार्वजनिक गणपती मंडळांमध्येही हेच चित्र दिसून आले. शासनाने घातलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची भूमिका बहुतांश मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे ढोलताशा पथकांचे वादन, मिरवणूक आदींना यंदा कात्री लागली आहे. मंडपातही कार्यकत्यांची वर्दळ नेहमीपेक्षा कमी आहे. मात्र, ही कसर भरून काढण्यासाठी ऑनलाइनचा मार्ग मंडळांनी निवडला आहे. त्यामुळे ‘गुलाल आणला का?’, ‘पथक आलं का?’, याऐवजी वेबसाइट अपडेट झाली का?’, ‘फोटो फेसबुकवर टाकला का?’, असे संवाद ऐकू येऊ लागले आहेत.

हेही वाचा: जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड

आम्ही पेठेत राहत असलो तरी गणेशोत्सवासाठी मूळ गाव असलेल्या इंदापूरला जाणार आहोत. आमच्याकडे दहा दिवसांचा पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यासाठी बाप्पाची मूर्ती पुण्यातून घेऊन जात आहोत. या वेळी कोरोनामुळे बजेट थोडे कमी केले आहे. पण, बाप्पाचे स्वागत दणक्यात करणार आहोत. त्याच्या आगमनाने कोरोनाचे संकट लवकर टळावे, अशीच इच्छा आहे.

- कृष्णकांत चव्हाण, ग्राहक

बाप्पासाठी सगळेच सज्ज

१) सार्वजनिक गणपतींची

ऑनलाइन तयारी

२) घरगुती गणेशोत्सवासाठी

दांडगा उत्साह

३) उत्साहाला नियमपालनाची

मिळतेय जोड

४) कोरोना संपविण्याचे

विघ्नहर्त्याला साकडे

५) खबरदारीसाठी

प्रशासन सतर्क

loading image
go to top