Girish Bapat Death : आपल्या माणसांना जपणारे ‘भाऊ’; बापट यांच्याकडे काम केलेले अंगरक्षक आणि चालकाची भावना

नोकरीच्या पहिल्याच दिवशी गाडीचा अपघात झाला, तरी सांभाळून घेत पुढील २४ वर्षे कामावर ठेवून घेणारे भाऊ... कुठेही गेले तरी जेवणाआधी आपले अंगरक्षक जेवले की नाही, याची चौकशी करणारे भाऊ...
driver Maruti Dimbale and bodyguard Pramod Jadhav
driver Maruti Dimbale and bodyguard Pramod Jadhavsakal
Summary

नोकरीच्या पहिल्याच दिवशी गाडीचा अपघात झाला, तरी सांभाळून घेत पुढील २४ वर्षे कामावर ठेवून घेणारे भाऊ... कुठेही गेले तरी जेवणाआधी आपले अंगरक्षक जेवले की नाही, याची चौकशी करणारे भाऊ...

पुणे - नोकरीच्या पहिल्याच दिवशी गाडीचा अपघात झाला, तरी सांभाळून घेत पुढील २४ वर्षे कामावर ठेवून घेणारे भाऊ... कुठेही गेले तरी जेवणाआधी आपले अंगरक्षक जेवले की नाही, याची चौकशी करणारे भाऊ... आपल्या माणसांची आपुलकीने कशी काळजी घ्यायची, याचा आदर्श त्यांनी घालून दिला होता... हे सांगताना गिरीश बापट यांच्याकडे काम करणारे वाहनचालक मारुती डिंबळे आणि अंगरक्षक प्रमोद जाधव यांना अश्रू अनावर झाले.

बापट यांच्याकडे गेल्या २४ वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करणारे डिंबळे म्हणाले, ‘भाऊंच्या पहिल्या गाडीपासून मी त्यांचा चालक म्हणून काम करतो आहे. नोकरीवर रुजू झाल्यावर पहिल्याच दिवशी मी एका दुचाकीला धडक दिली. धडक झाल्यावर भाऊ गाडीतून बाहेर आले. त्यांना पाहून तो दुचाकीस्वार काही न बोलता निघून गेला. मी मात्र प्रचंड घाबरलो होतो. आता आपली नोकरी जाणार, याची मला खात्रीच वाटत होती. पण, भाऊंनी तसे काहीच केले नाही. ‘गाडी हळू चालवत जा’, एवढेच समजावले. त्यानंतर आजतागायत मी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुढे हजारो किलोमीटर प्रवास केला, पण एकही अपघात होऊ दिला नाही.’

driver Maruti Dimbale and bodyguard Pramod Jadhav
Girish Bapat Passes Away: गिरीश बापटांच्या निधनावर 'या' नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

अशाच काहीशा भावना बापट यांचे अंगरक्षक म्हणून काम करणारे प्रमोद जाधव यांनी व्यक्त केल्या. ‘मी गेली १६ वर्षे भाऊंचा अंगरक्षक म्हणून काम केले. माझे शिक्षण बारावीपर्यंतच झाले होते. मात्र भाऊंकडे आल्यावर त्यांनी मला पदवीचे शिक्षण घ्यायला लावले, फौजदारकीची परीक्षा द्यायला लावली. शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक मदत देखील केली. अभ्यासासाठी ते कायम सुटी द्यायचे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी शिक्षण पूर्ण करू शकलो. कुठेही गेले तरी त्यांच्या जेवणाअगोदर आम्ही जेवलो की नाही, याची चौकशी ते करत असत,’ हे सांगताना जाधव यांचा कंठ दाटून आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com