esakal | पुणे : समस्यांच्या गर्तेत कात्रज चौक, वाहतूक कोंडी नित्याचीच । katraj
sakal

बोलून बातमी शोधा

katraj

समस्यांच्या गर्तेत कात्रज चौक, वाहतूक कोंडी नित्याचीच

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

कात्रज : कोंढवा, सातारा रस्ता, नवलेपूल आणि पुणे शहरातून एकाचवेळी येणाऱ्या वाहनांमुळे कात्रज चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून कासवगतीने होणाऱ्या वाहतूकीने वाहनचालक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रासले आहेत.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

चौकात चारही बाजूंनी येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणांवर असते. शहरातून सातारा, कोल्हापूर, सांगली, गोवा, बंगळुरु आदी शहरांकडे जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ असते. त्याचबरोबर, कोंढव्याकडून मुंबईकडे आणि नवलेपूलाकडून कोंढवामार्गे सोलापूर रस्त्यांवर निघणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणांवर असते.

शहरातून सातारा रस्त्यांवर निघायचे झाल्यास दोनवेळा सिग्नल पार करावा लागतो. तर पुढे सातारा रस्त्यांवर बाहेर निघताना रस्ता अरुंद असल्याने वाहने कोंडीत सापडतात. चौकात एकूण चार मुख्य तर चार उपरस्ते येतात. चौकातील वाहतूक सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न, अंदोलने झाली. मात्र, आणखी कुठलाही ठोस पर्याय निघालेला नाही.

हेही वाचा: पेसा क्षेत्रातील कायम राहणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळावा

कोंडीची मुख्य कारणे

चौकात पीएमपीएल बस थांबा असल्याने पीएमपीएल बसेसना थांबण्यांसाठी मोठी जागा लागते. त्याचबरोबर चौकातून होणारी रिक्षा वाहतूकही मोठ्या प्रमाणांवर असून रिक्षाचालकांची निश्चित जागा नाही. निश्चित जागा नसल्याने रिक्षा कोणत्याही ठिकाणी थांबतात. तसेच, अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

"कात्रज चौकात वाहतूक पोलिस त्यांचे चोख कर्तव्य बजावत आहेत. त्याठिकाणी काहीही गरज लागल्यास आमचे सहकार्य असते. परंतु, काही ठिकाणी असलेली बॉटलनेक सारखी परिस्थिती सुधारणे आणि अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. तसेच, अपूर्ण कामांना गती दिल्यास वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल" - प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ (वाहतूक विभाग)

हेही वाचा: जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’

"कात्रज चौक म्हणजे वाहतूक कोंडीचा फास झाला आहे. चौकातून कोठे जायचे झाल्यास घरातून किमान अर्धातास आधी निघावे लागते. कात्रजचौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हव्या त्या उपाययोजना करून प्रशासनाने कायमचा तोडगा काढायला हवा"- बाजीराव कोंढाळकर, स्थानिक नागरिक

समस्यांच्या गर्तेत कात्रज चौक : उड्डाणपुलाच्या कामांना गती मिळण्याची गरज

कात्रजला कायम दुय्यम स्थान मिळत असल्याची नागरिकांची भावना

विकासकामांच्या बाबतीत कायम कात्रजला दुय्यम स्थान मिळत असल्याची स्थानिक नागरिकांची भावना आहे. त्यामुळे आतातरी वंडरसिटी ते माऊली गार्डनपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळावी आणि पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून आता जोर धरत आहेत.

कात्रजसह दक्षिण पुण्यातील उपनगरांची कोंडी सोडविण्यासाठी भारती विद्यापीठ ते गुजरवाडी फाट्यापर्यंत उड्डाणपूल मंजूर होऊन काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, त्याबाबत काहीच नियोजन शासनांकडून किंवा महापालिकेकडून होताना दिसत नाही. या रस्त्यांवर मृत्यूच्या सापळ्यातून लोक रस्ता शोधत असतात. सातत्याने होणारे मृत्यू, अपघातांची मालिका अशी अनेक कारणे असतानांही यावर काहीच विचार होताना दिसत नाही. कात्रज चौकात गरज असताना दुसरीकडे विकास होत असल्याची खंत स्थानिक नागरिक धनंजय आतकरे बोलून दाखवतात.

कात्रजच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिकांकडून एखादे आंदोलन केले जाते. त्याचीही महापालिका किंवा प्रशासनाकडून घेण्यात येत नाही. कात्रज चौकाचा राजकीय दृष्टीकोनांतून विचार केल्यास या चौकात दोन खासदार, तीन आमदारांचा संबंध येतो. पण, हा प्रश्न कोणीही विधानसभेत किंवा संसदेत मांडताना दिसत नसल्याचे दुःखही नागरिक बोलून दाखवतात. सातारा रस्ता हा महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाला कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करताना मर्यादा आहेत. त्यामुळे खासदार किंवा आमदारांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करून त्यावर उपयोजना करणे सोपे होणार आहे.

अशा हव्यात उपायोजना

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातारा रस्त्याच्या रुंदीकरण व्हायला हवे

सातारा रस्त्यांवर किनारा हॉटेलनजीक वाहतूक पोलिसांची गरज

वाहतूक पोलिसांसोबत मदतीसांठी जादा वॉर्डनचीही आवश्यकता

वाहतूकीला अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची गरज

अवजड वाहनांना थांबण्यास सक्त मनाई करण्याची गरज

वाहतूक दिशादर्शक फलकांची संख्या वाढविण्याची गरज

चौकातील अतिक्रमणे हटविण्याची गरज

"वंडरसिटी ते माऊली गार्डनपर्यंतच्या उड्डाणपुलाचे कामाचे भूमिपूजन झाले आहे. त्याचे कामही सुरु झाले असून दोन वर्षात हा पूल पूर्ण होईल. त्यानंतर या भागातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल." - श्रुती नाईक, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

loading image
go to top