Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

केवळ आमचं खात्रीशीर उत्पन्नाचं साधन असलेले सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी सरकारने द्यावी. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न सुरू होईल. म्हणजे कुणापुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही.

पुणे : नातवं रात्री उठतात. दूध हवंय म्हणतात, तेव्हा आसवं ढाळणं सोडून काहीच करता‌ येत नाही. कारण गेली तीन दशकं तालावर चाललेली बोटं थांबली आहेत. कार्यक्रम बंद, पैसा नाही म्हणून या बोटांवर बोंबिल आणि सुकट विकण्याची वेळ आली आहे.

पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रात तालवाद्य वादक असलेले सोमनाथ फाटके यांची ही व्यथा आहे. ते म्हणतात, पाच महिने झाले मनोरंजनाचे‌ कार्यक्रम बंद आहेत. नाट्यगृहे बंद आहेत, कोणत्याही कार्यक्रमांना बंदी आहे. मग पैसा आणायचा कुठून? या कार्यक्रमांमधून किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याएवढं उत्पन्न मिळत होतं. तेही थांबलं आहे. जगायचं कसं हा प्रश्न आहेच. सगळं आयुष्य वाद्य वादनात गेलं. आता‌ वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर दुसरं काम मिळेल का, ही देखील चिंता आहे.

पुणे : ...म्हणून ट्राफिक पोलिसालाच बसला ५ हजार रुपये दंड!​

अनेक वर्षे तालवाद्ये वाजविली आता दरोदार जाऊन बोंबील, सुकट विकण्याची‌ वेळ आली आहे. या पाच महिन्यात सर्व क्षेत्रातील लोकांच्या‌ समस्यांकडे राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष गेले, पण गायक-वादक कलाकारांच्या व्यथा कुणी जाणून घेणार आहे की नाही? आम्हाला मदतीची अपेक्षा नाही. केवळ आमचं खात्रीशीर उत्पन्नाचं साधन असलेले सांस्कृतिक‌ कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी सरकारने द्यावी. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न सुरू होईल. म्हणजे कुणापुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही."

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र​

पराग चौधरी हेही तीन दशकांहून अधिककाळ अभिनय आणि निवेदन क्षेत्रात आहे. ते म्हणतात, "नाईलाज म्हणून गावाकडून ज्वारी आणतो, भाजीपाला घेतो आणि तो आम्ही नवरा-बायको विकतो. मी स्वत: सोसायट्यांमध्ये जाऊन जाहिरात‌ करतो आणि ऑर्डर येईल, तशी विक्री करतो. लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग-व्यवसाय सुरू झाले. बाजार सुरू झाला; पण आम्हा कला क्षेत्रातील कलाकारांना उत्पन्नाचे साधन नाही. आम्हाला मान-प्रसिद्धी मिळाली, पण ती काही दोनवेळचे अन्न देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की सोशल डिस्टंसिंग आणि अन्य नियमांचे पालन आम्ही करू. फक्त सांस्कृतिक‌ कार्यक्रम आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी द्यावी."

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune many artists faces financial crisis due to corona and lockdown