Fight with Corona : 'त्या' दोन रुग्णांना मिळालेला डिस्चार्ज दिलासा देणारा : महापौर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

आज मनपाच्या वाहनातून दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस या सर्वांनी त्यांना उल्हासपूर्ण, आनंददायी, भावपूर्ण वातावरणात टाळ्या वाजवून निरोप दिला.

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील दोन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार बुधवारी (ता.२५) त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. सदरची घटना ही अत्यंत दिलासा देणारी असून सध्याच्या तणावाच्या वातावरणात एक महत्त्वाचा संदेश देणारी असल्याची प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलेली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत पुणे महापालिका पुणेकरांच्या साहाय्याने लढा देत आहे, अद्यापही हा लढा चालू असून हा लढा संपलेला नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, तसेच केंद्रशासन, राज्यशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. संचार बंदी व लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी नियमांचे, सूचनांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी घरीच राहणे योग्य आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यात आपण सर्वजण यशस्वी होऊ. 

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील दोन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना देण्यात आलेला डिस्चार्ज व घरी पाठविण्यात आले हि महाराष्ट्रातील पहिलीच दिलासा देणारी घटना आहे. नागरिकांना विनंती करण्यात येते कि, त्यांनी स्वतःची काळजी घेतानाच  कुटुंबीय,व इतरांचीही काळजी  घ्यावी, व हा लढा यशस्वी करण्यास सर्वानीच सहकार्य करण्याचे आवाहन महापौर  मोहोळ यांनी केले आहे. 

- Big Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कि, नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,आज दोन्हीही रुग्ण आपल्या घरी जात आहे,हि कोरोना विषाणूंच्या प्रदूर्भावाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या यशस्वी लढ्याची दिलासा देणारी घटना आहे,या प्रसंगी त्यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अतिरिक्त मनपा आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल यांनी सांगितले की, केंद्र व राज्यशासनाने दिलेले निकष व लॉकडावूनच्या कालावधीत सूचना, नियम पाळले पाहिजे. १४ दिवस विलगीकरणाच्या काळात दैनंदिन सूचना व उपाय योजना केल्या पाहिजेत. काही लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार व मार्गदर्शन घेतले पाहिजे. घरोघरी येत असलेल्या पथकांना सहकार्य करून मार्गदर्शन घेतले पाहिजे.

- भूकंपाच्या धक्क्याने रशिया हादरले; त्सुनामीचा इशारा

जाहीर केलेल्या संपर्क नंबरवर संपर्क साधून मार्गदर्शन घेतले पाहिजे, लक्षणे आढळल्यास मनपाच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातून उपचार घेतले पाहिजे. या रुग्णालयात अत्यंत काळजी घेण्यात येऊन परिणामकारक उपचार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास लपवू नये. वेळीच उपचार घेणे आपल्यासाठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज ज्या दोन रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. त्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जीवघेणा असला तरी सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. 

- गरीबांच्या घरातील चुली पेटत्या ठेवा - इम्तियाज जलील 

शासनाने दिलेल्या सूचना पाळणे आवश्यक

९ मार्चला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झालो. येथील वातावरण, सुविधा उत्तम असून केले जाणारे उपचार व रुग्णांची घेतली जाणारी काळजी उत्कृष्ट आहे. डॉक्टरांनी केलेल्या सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळेच आम्ही उभयता या निदानातून बरे झालो आणि आज आनंदाने घरी जात असल्याचे त्यांनी सांगितले. आज मनपाच्या वाहनातून दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस या सर्वांनी त्यांना उल्हासपूर्ण, आनंददायी, भावपूर्ण वातावरणात टाळ्या वाजवून निरोप दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune mayor made a statement after corona patient discharge from Naidu Hospital