पुण्यात बाप्पांच्या विसर्जनाला कचऱ्याचे कंटेनर? मनसेच्या आरोपावर महापौरांनी दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

केवळ राजकीय भावनेतून विघ्न आणून वातावरण बिघडविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. अशा आम्ही जुमनत नाही.

Ganesh Festival 2020 : पुणे : गणेशोत्सवाआधीपासून चर्चेत राहिलेल्या विसर्जनाच्या मुद्यावरून आता राजकीय खडाखडीला सुरवात झाली आहे. विसर्जनासाठी पुरविलेल्या फिरत्या हौदांसाठी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याचा मुद्दा उपस्थितीत करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोप महापौर मुरलीवर मोहोळांनी फेटाळून लावले आहेत.

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...'​

जगात कोणीच्या 'बाप्पा'च्या विसर्जनासाठी कचऱ्याचे  कंटनेर वापरणार नाहीत; पण तसा समज पसविणाऱ्या विघ्नसंतोषींना आम्ही किमत देत नाही, अशा शब्दांत महापौर मोहोळ यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे. अशा वागण्यातून आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही महापौरांनी दिला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर साधेपणाने विशेषत: घरीच गणपतीचे विसर्जन करण्याचा आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले आहे.

पुण्यात कोचिंग क्‍लासेसला परवानगी मिळणार का? आयुक्तांनी दिली माहिती​

त्याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कचरा साठविण्याचे कंटेनर असल्याचा आरोप करीत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आंदोलन केले होते. या संदर्भात दोषींवर कारवाईची मागणीही लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी खातरजमा करीत, मनसेवर आगपाखड केली आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, "पुणेकर साधेपणाने आणि अत्यंत संयमाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यांना पुरविलेल्या सुविधांबाबत नागरिकांची तक्रार नाही. मात्र केवळ राजकीय भावनेतून विघ्न आणून वातावरण बिघडविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. अशा आम्ही जुमनत नाही."

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनसेची भूमिका खोटी असल्याचे सांगितले. फिरत्या हौदांसाठी वापरलेल्या यंत्रणेची चौकशी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी मनसेने आयुक्तांकडे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mayor Murlidhar Mohol criticized Maharashtra Navnirman Sena