esakal | स्वप्नांच्या उंबरठ्यावर! दोन महिन्यांत पुणेकर बसणार मेट्रोत
sakal

बोलून बातमी शोधा

Metro

स्वप्नांच्या उंबरठ्यावर! दोन महिन्यांत पुणेकर बसणार मेट्रोत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मेट्रोत (Metro) बसून प्रवास करण्याचे पुणेकरांचे (Pune) स्वप्न साकार होण्याच्या दिशेने गुरुवारी रात्री उशिरा पडलेले पाऊल लवकरच मार्गी लागणार आहे. अवघ्या दोन महिन्यांत वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो उपलब्ध होईल, यासाठी आता महामेट्रोचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कारण, ट्रॅकचे काम आता पूर्ण झाले असून, तीन स्थानकांची रखडलेली कामे पूर्ण करण्यावर भर असेल. (Pune Metro Starts in Two Months)

वनाज-रामवाडी मार्गावर महामेट्रोने गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान तीन किलोमीटर अंतरावर मेट्रोची तांत्रिक चाचणी घेतली. अर्थात, ही अधिकृत चाचणी नव्हती. परंतु, मेट्रोमार्गावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ट्रायलच्या पूर्वीचा एक टप्पा म्हणून ही चाचणी घेतली. यामुळे परिसरातील रहिवाशांत प्रचंड कुतूहल निर्माण झाले. चाचणीचे लोकांनी टिपलेले व्हिडिओ व्हायरल झाले. मेट्रोने गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांच्या उत्साहापुढे तो टिकला नाही.

हेही वाचा: ...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !

चाचणीमध्ये ट्रॅक (लोहमार्ग), ओव्हरहेड केबल, सिग्नल, व्हाया डक्ट आदींचीही तपासणी झाली. ट्रॅकवरून मेट्रो धावताना या पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठीच मेट्रोचा वेग अगदी ताशी २० किलोमीटरपेक्षा कमी ठेवला होता. सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो मार्गाची पाहणी झाली. त्यासाठी पाच विभागांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. संपूर्ण चाचणी अपेक्षेनुसार झाली. किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या आहेत. त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. आता स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.

नागपूरचे कोच पुण्यात

वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी प्रत्येकी तीन डब्यांच्या दोन रेल्वेगाड्या एप्रिलच्या अखेरीस महामेट्रोने नागपूरहून पुण्यात आणल्या. वनाज येथील मेट्रोच्या यार्डातच त्या रेल्वेगाड्यांचे डबे उतरविले. त्यांची जुळणी ट्रॅकवरच केली. ट्रायलसाठी गुरुवारचा मुहूर्त निश्चित केल्यावर ट्रॅकवर चाचणी घेतली. अर्थात, नागपूरहून आलेल्या दोन रेल्वे ट्रायलसाठीच आहेत. मेट्रोमार्गावरील सहा गाड्यांच्या डब्यांचे उत्पादन परदेशात सुरू असल्याचे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

आठ दिवसांपूर्वीच तयारी

वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्याचे नियोजन आठ दिवसांपूर्वीच केले. त्यानुसार त्याची तयारी सुरू होती. ट्रॅक, ओव्हरहेड केबल, रेल्वे डबे, सिग्नलिंग आणि व्हाय डक्टची उभारणी करणारा विभाग, असे पाच विभागांतील अधिकारी चाचणीदरम्यान उपस्थित होते. चाचणीपूर्वी पाचही विभागांनी पाहणी करून त्यांच्या- त्यांच्या विभागाकडून ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर मेट्रोची चाचणी निश्चित केली.

हेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

दोन महिन्यांत कामे पूर्ण करणार

वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, एसएनडीटी आणि गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोच्या स्थानकांचे काम सध्या सुरू आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे या कामांना थोडा उशीर झाला. आता पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी वनाज, आयडियल कॉलनी आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोने लक्ष केंद्रित केले आहे. या स्थानकांची कामे सुमारे ६०-७० टक्के पूर्ण झाली आहेत. आता फरशी बसविणे, सरकते जिने उभारणे, लिफ्ट बसविणे, अंतर्गत सजावट आणि फर्निचर, प्लॅटफॉर्म उभारणे ही कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.

पिंपरीत ऑगस्टमध्ये उद्घाटन?

पिंपरी - फुगेवाडी व संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाचे प्रत्येकी १४० मीटर प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोचे उद्‌घाटन होण्याची चिन्हे आहेत. मेट्रोच्या कामांनी जोर धरला असून, फुगेवाडी स्थानकाचे काम ९० टक्के व संत तुकारामनगर स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट १६.५८९ किमी मेट्रोमार्गावरील फुगेवाडी व संत तुकारामनगर मेट्रोमार्ग स्थानकाच्या कामाला वेग आला आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंत चाचणीही झाली आहे. या मार्गिकेवर दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी, संत तुकारामनगर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी व निगडी अशी नऊ स्थानके आहेत. फुगेवाडी स्थानकावर बांधकाम, विविध सेवा, सिग्नल, एमव्हीपी व प्लबिंगच्या कामासाठी दहा एजन्सी काम करीत आहेत. मेट्रोच्या बाहेरील बाजूचे व स्थानकाच्या डेव्हलपमेंटचे काम सुरू असून, अलायन्मेंट, रंगकाम व टेस्टिंगचे काम सुरू आहे. स्थानकावरील सिलिंग, सायकल ट्रॅक व फुटपाथचे काम पूर्ण झाले असून, सीसीटीव्ही सर्व ठिकाणी बसविले आहेत. सध्या फुगेवाडी स्थानकाचे काम वेगात सुरू असून, या ठिकाणी १५० कुशल कामगार काम करीत आहेत,

तसेच संत तुकारामनगरमधील प्लॅटफॉर्म व स्थानकाचे सर्व काम पूर्ण झाले असून, किरकोळ देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

हेही वाचा: एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने एम.टेक अभ्यासक्रम सुरू

फुगेवाडी व संत तुकारामनगर स्थानकाची कामे...

 • स्थानक व प्लॅटफॉर्म पिलर

 • सिग्नल

 • रेन वॉटर हार्वेस्टिंग

 • तिकीट खिडकी

 • तिकीट स्कॅनिंग रांगा

 • फायर सिस्टिम

सुविधा व आकर्षण...

 • सरकते जिने

 • लिफ्ट

 • महिला व पुरुष स्वच्छतागृह

 • तिकीट ऑफिस मशिन

 • प्रवेशद्वार

 • डिजिटल स्क्रीन

 • मेट्रो रुफ व विविध संदेश थीम

फुगेवाडी स्थानकाचे काम ९० टक्के व संत तुकारामनगर स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो उद्‌घाटन तारीख अद्याप निश्चित नाही. प्राथमिक संमती प्रक्रियेचे काम सुरू आहे. शक्य झाल्यास पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला हजेरी लावतील.

- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

loading image