बाऊन्सर हटवण्यासाठी 'जम्बो' कोविड सेंटरमध्ये घुसलेल्या मनसेच्या रुपाली पाटील यांना अटक

ज्ञानेश सावंत
Tuesday, 8 September 2020

नसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोक केल्याची घटना ताजी आहे. तेव्हाच रुपाली पाटलांना अटक झाली आहे.

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या दारातील 'बाऊन्सर' हटवण्याचा पवित्रा घेऊन 'जम्बोत घुसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका लावून त्यांना न्यायालयातही नेण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुपाली पाटलांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसेच्या महिला आघाडीने पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली असून, रुपाली पाटलांना सुडापोटी अटक केल्याच आरोप महिला पदाधिकारी करीत आहेत. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरची गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. त्यात 'जम्बो'च्या दारात नेमलेले 'बाऊन्सर' रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी हुजत घालत आहेत. त्यावरून वादाच्या घडत असल्याकडे लक्ष वेधत रुपाली आणि मनसेच्या काही कार्यकत्यांनी गेल्या आठवड्यात शिवाजीनगर येथील 'सीओईपी'च्या आवारात आंदोलन केले. तेव्हा आता विभागीय आयुक्त सौरभ राव आणि काही अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. राव यांना भेटण्याचा आग्रह करीत पार्टील यांनी जम्बोच्या मुख्यप्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला. तेव्हा, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि पाटील यांच्यात किरकोळ वादही झाला होता. मात्र, आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे 'बाऊन्सर' का नेमता असा प्रश्न करीत पाटील या थेट राव यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली.

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​  

रुपाली पाटील यांच्या मागणीची दखल घेत, राव यांनी सुरक्षा व्यवस्थेला सूचना केल्या होत्या. त्यानंतरही दारातील बाऊन्सर' हटविण्यावरून रुपाली आणि त्यांचे कार्यकर्ते ठाम राहिले होते. त्यानंतर जम्बो व्यवस्थापनाकडून रुपाली यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पाटील यांना मंगळवारी दुपारी अटक झाली. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान, मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना ताजी आहे. तेव्हाच रुपाली पाटलांना अटक झाली आहे.

'एमपीएससी'ची परीक्षा आता तरी नक्की होणार का ?

रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या जम्बोत गेटवरून उडी मारत आत घुसण्याच्या रुपाली पाटलांच्या भूमिकेबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. आरोग्य सुविधा पुरविलेल्या जाणाऱ्या ठिकाणी अशी आंदोलने नको, अशी अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune MNS Rupali Patil arrested by police for trying to enter in Jumbo Covid Center