

Mundhwa Land Deal Probe Ordered
Sakal
पुणे : मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 'दूध का दूध और पानी का पानी' होईल. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कर्वेनगर येथे रविवारी (ता.९) सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, "" लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकेल." माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, त्यांनी हा विषय आता संपला आहे असे सांगत, या विषयावर अधिक बोलणे टाळले.
"“हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत ठेवण्याचे कार्य आज काही मोजक्या संघटना करत आहेत. त्यात पतित पावन संघटनेचे योगदान मोठे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्व विचारधारेच्या प्रसारासाठी झाला. आज शिवसेना आणि पतित पावन संघटना हे भगव्या रंगाचे दोन प्रवाह एकत्र आले आहेत; हा हिंदुत्वासाठी ऐतिहासिक क्षण आहे,"" असे शिंदे यांनी नमूद केले.
कर्वेनगर येथे पतित पावन संघटनेतर्फे रविवारी रात्री आयोजित ‘युती हिंदुत्वाची’ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, तसेच पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, सरचिटणीस नितीन सोनटक्के, शहरप्रमुख श्रीकांत शिळीमकर आदी उपस्थित होते.
'लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय असून, ती बंद होणार नाही. आमच्यासाठी राजकारणात शब्दाला महत्त्व आहे. बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरूनच आम्ही काम करत आहोत. काही लोकांसारखे आम्ही खुर्ची दिसली की रंग बदलत नाही, ” असे शिंदे यांनी नमूद केले.