पुणे महापालिकेत आरोप-प्रत्यारोपात अर्थसंकल्पाला मंजुरी

पुणे महापालिकेत आरोप-प्रत्यारोपात अर्थसंकल्पाला मंजुरी

पुणे - सलग तीन दिवस चाललेली चर्चा, चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले आरोप- प्रत्यारोप अशा वातावरणात महापालिकेच्या पुढील वर्षीच्या (२०२०-२१) ७ हजार ३९० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी मंजुरी देण्यात आली. 

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर सोमवारपासून चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष करण्याची संधी साधली. विरोधकांनी केलेल्या टिकेला सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून वाद झडले. दावे-प्रतिदावे करीत कारभारांच्या कारभाराची चौकशी करण्यापर्यंतची मागणी या निमित्ताने झाली.

सलग दोन दिवस ज्या पद्धतीने चर्चा झाली, त्याचा अनुभव लक्षात घेऊन अर्थसंकल्पावरील चर्चा किती काळ सुरू ठेवायची, याचा निर्णय घेण्यासाठी पक्षनेत्यांची आज बैठक झाली. त्या बैठकीत ठरल्यानंतर त्यावरून देखील आज सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली. त्यातून काही नगरसेवकांना संधी मिळाली, तर काहींना संधी मिळाली नाही, त्यामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरसेविकांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.  

अनेक नगरसेवकांनी अर्थसंकल्प सोडून व्यक्तिगत गोष्टींवरच मते मांडल्याची खंत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, ‘‘अंदाजपत्रक आत्मविश्वासाने नाही तर आंधळेपणाने मांडले गेले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक पुरेशी तरतूद मिळाली म्हणून ओरड करीत आहेत. परंतु त्यांनी जे पेरले, तेच आज उगविले आहे.’’

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘पाच ते सहा प्रकल्पांसाठी वर्षानुवर्षे अंदाजपत्रकात तरतुदी केली जाते. तशीच तरतूद या वर्षीही करण्यात आली आहे. पण हे प्रकल्प सुरू होणार आहे की नाही. घनकचरा व्यवस्थापनाकरिता केलेल्या तरतुदीतील ९० कोटी रुपयांच्या तरतुदीविषयी शंका व्यक्त करीत अशा पद्धतीने पैसा उधळला तर बचत कशी होणार, असा सवालही सुतार त्यांनी सत्ताधारी पक्षाला केला. 

‘फुगविलेला अर्थसंकल्प’’ अशी टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून शीतशव पेटी खरेदी करण्यात आल्या असताना, पुन्हा तरतूद करणे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असा हा प्रकार आहे, अशा शब्दात शिंदे यांनी खिल्ली उडविली. तर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी गेल्या आर्थिक वर्षात अडीच हजारांची तूट असताना हे अंदाजपत्रक पुन्हा का फुगवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला.‘‘सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच निधी खर्ची पडत नाही. या अंदाजपत्रकात अनेक योजना अवास्तववादी आहेत. महापालिकेचे गृहीत धरलेले उत्पन्न स्वप्नरंजक आहेत,’’ असेही त्या म्हणाल्या.

उपमहापौर सरस्वती शेंडगे, विद्यमान सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, योगेश ससाणे, गफुर पठाण, अजित दरेकर, सुनीता वाडेकर, अश्‍विनी लांडगे यांनी अंदाजपत्रकावर आपले मत मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com