esakal | लॉकडाऊनमध्ये दीड लाख पुणेकरांनी घेतले ऑनलाईन ट्रेडिंग- इन्व्हेस्टमेंटचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

online classes

केवळ काही हजार नव्हे तर तब्बल १.५ लाख पुणेकरांनी लॉकडाऊनच्या वर्षभराच्या कालावधीत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबाबत ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्याचे आता समोर आले आहे.

लॉकडाऊनमध्ये दीड लाख पुणेकरांनी घेतले ऑनलाईन ट्रेडिंग- इन्व्हेस्टमेंटचे धडे

sakal_logo
By
सलील उरुणकर - सकाळ वृत्तसेवा

पुणेः लॉकडाऊनच्या गेल्या वर्षभरातील कालावधीत अनेकांनी चिप्सच्या पाकिटात किती चिप्स आहेत किंवा अमुक गाण्यामध्ये तमूक शब्द कितीवेळा वापरला गेला आहे याचा अभ्यास केला आणि ते व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून उत्तीर्णही झाले. पण याच वेळेचा सदुपयोग करणारे बहुतांश नागरिक पुण्यात असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. कसे? केवळ काही हजार नव्हे तर तब्बल १.५ लाख पुणेकरांनी लॉकडाऊनच्या वर्षभराच्या कालावधीत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबाबत ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्याचे आता समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कोर्सेस पूर्ण करणाऱ्या पुणेकरांची ही संख्या मुंबईकरांच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे, या १.५ लाख विद्यार्थ्यांपैकी आठ टक्के म्हणजे १२ हजार जण २५ ते ३४ वर्ष वयोगटातील महिला आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरवात केली तेव्हापासून म्हणजे आपल्याकडे साधारण मार्च २०२० पासून आर्थिक असुरक्षितता भासायला सुरवात झाली. कारण या महामारीला रोखण्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे ठप्प पडलेले उद्योग-अर्थव्यवस्थेचे चक्र. आर्थिक विवंचनेतून मार्ग कसा काढायचा, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पैसे कमवता येतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात त्यावेळी आला असेल. मात्र त्यावर तातडीने काम करायला सुरवात केली ती चाणाक्ष पुणेकरांनी! विशेषतः ऑनलाईन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा पूर्वानुभव नसलेले (फर्स्ट टाईम इन्व्हेस्टर) यांनी यासंबंधीचे ऑनलाईन शिक्षण घेत संधीचे सोने केले.

हेही वाचा: पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू

सबस्क्रिप्शन आधारित आणि ऑनलाईन अर्थविषयक शिक्षण क्षेत्रातील कंपनी लर्नअॅप डॉट कॉमने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. फर्स्ट टाईम इन्व्हेस्टर्सच्या या पुण्यातील वाढलेल्या संख्येबाबत बोलताना लर्नअॅपचा संस्थापक प्रतीक सिंग म्हणाला, “जेव्हा लॉकडाऊन झाला त्यावेळी लोक घरातून काम करत होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे अधिक मोकळा वेळ होता. त्याचसुमारास स्टॉक मार्केटमध्येही बराच चढ-उतार सुरू होता. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या वर्तणुकीमध्ये दोन ठळक बदल आम्हाला दिसले. पहिला बदल म्हणजे शिकण्यासाठी ऑनलाईन माध्यमाची स्वीकारार्हता वाढली आणि दुसरा बदल म्हणजे वेबिनार हे काहीतरी नवीन शिकण्याचे एक विस्तारित माध्यम बनले. भरपूर वेळ हातात असल्यामुळे ग्राहक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवत असत. आमच्या प्लॅटफॉर्मवर असलेली साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडलेली माहिती लोकांना आवडली. त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या व त्यासंबंधीचा कोर्स करणाऱ्यांची संख्या एकदम वाढली.”

हेही वाचा: तुमच्या ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात वाढ झालीय? तर नक्की वाचा

फक्त पुण्यात किंवा भारतातच असा ट्रेंड दिसत आहे असे नाही. कोरोना महामारी-पश्चात जगभरातील बहुतांश तरुण, विशेषतः मिलेनियल इन्व्हेस्टर्स, यांनी ट्रेडिंग सुरू करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडली आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या वर्षभरात नवीन डिमॅट अकाउंट उघडण्याची संख्या ही आतापर्यंतची उच्चांकी म्हणजे १०.७० कोटी एवढी होती. संपूर्ण आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये उघडण्यात आलेल्या डिमॅट अकाउंटच्या तुलनेत ती संख्या दुप्पट आहे.

loading image