दिल्लीतील धुक्याची ‘मेख’ मराठी शास्त्रज्ञाच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

राजधानीतील धुक्यामागचे वरवरची कारणे माहीत असली तरी नक्की याला कारणीभूत कोणता घटक आहे. हे आजवर माहीत नव्हते. नुकतेच एका मराठी संशोधकाने यातील ‘मेख’ शोधली आहे.

पुणे -  देशाची राजधानी नवी दिल्ली आणि परिसर गेल्या अनेक वर्षांपासून दाट धुक्याच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. धुक्यामुळे कमी होणाऱया दृष्यमानतेचा दिल्लीतील विमानोड्डाण, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम तर होतोच. त्याचबरोबर दिल्लीकरांना आरोग्यासंबंधी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजधानीतील धुक्यामागचे वरवरची कारणे माहीत असली तरी नक्की याला कारणीभूत कोणता घटक आहे. हे आजवर माहीत नव्हते. नुकतेच एका मराठी संशोधकाने यातील ‘मेख’ शोधली आहे.

काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज

चेन्नईतील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’चे (आयआयटी मद्रास) सहयोगी प्राध्यापक डॉ. सचिन गुंठे यांच्या नेतृत्वातील संशोधक गटाने दिल्लीतील धुक्याला ‘क्लोराईड’प्रचूर कणांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत असल्याचे सिद्ध केले आहे. मुळचे जळगाव जिल्ह्यातील डॉ. गुंठे यांचे शिक्षण नाशिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले. पुढे पुण्यातीलच भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) पीएच.डी. केली होती. ‘नेचर जिओसायन्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित या संशोधनात संशोधक विद्यार्थी सुभा राज, उपासना पांडा, अमित शर्मा आणि इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठाचा इघॉन डर्बीशायर यांचा समावेश आहे. हा अभ्यास जर्मनीच्या मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट, अमेरिकेच्या हार्वड विद्यापीठ, जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या साहाय्याने करण्यात आला.

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार

असे झाले संशोधन...
- दिल्लीतील सापेक्ष आद्रता, तापमान आणि अतिसुक्ष्म कण अर्थात पीएम २.५ ची रासायनिक रचना व गुणधर्म मोजण्यात आली
- यासाठी परदेशी विद्यापीठाकडून आणलेली अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात आली
- हवेत ‘पीएम२.५’ या प्रदूषकांचे वस्तुमान कमी आणि क्लोराईडचे प्रमाण जास्त
- या परिसरात अमोनिया वायूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे
- हवेतील हायड्रोक्लोरीक ॲसिड (क्लोराईड कण) आणि अमोनिया एकत्र येऊन
‘अमोनिअम क्लोराईड’ बनवतात
- ‘अमोनिअम क्लोराईड’ सारख्या ऐरोसोल कणांमध्ये पाणी शोषून धरण्याची
क्षमता सर्वाधीक
- क्लोराईड कणांचे वाढलेले आकारमान आणि शोषलेले पाणी यामुळे दिल्लीत दाट
धुके तयार होते

अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ

धुके कमी करण्यासाठी...
- हायड्रोक्लोरीक ॲसिड उत्सर्जित
करणाऱ्या प्रक्रिया किंवा स्रोतांचा पर्याय हवा
- कचरा डेपो, शेकोटी पेटवताना प्लास्टिक जाळण्यावर प्रतिबंध आवश्यक
- ई-कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

दिल्लीसारख्या प्रदूषित शहरातील हवेत अजैविक सल्फेटचे अंश मिळण्याची अपेक्षा असते. पण येथे मात्र क्लोराईडच्या कणांचे अंश मोठ्या प्रमाणावर सापडले. क्लोराईडचा थेट संबंध दाट धुक्याशी आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही रासायनिक विश्‍लेषण केले. उघड्यावर जाळण्यात येणारे प्लास्टिक आणि औद्योगीक प्रक्रियांतून उत्सर्जित होणाऱ्या हायड्रोक्लोरिक ॲसीडवर बंधने घालणे आवश्यक आहे.
- डॉ. सचिन गुंठे, सहयोगी प्राध्यापक, आयआयटी मद्रास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune news Marathi scientists fog in Delhi