माध्यमांना धडा शिकवला पाहिजेः निलम गोऱ्हे

अविनाश पोफळे
शनिवार, 27 मे 2017

"ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी लवकरच अद्ययावत सोयी-सुविधायुक्त मोबाईल व्हॅन घेण्यात येणार आहे. त्याद्वारे 1 हजार 400 ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रात आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच डिजिटल आणि सोलर प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.''
- प्रवीण माने, सभापती, बांधकाम आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद

पुणेः "परिचारिकांबद्दल आपल्याकडील नाटक, सिनेमांमधून वाईट चित्र निर्माण करण्यात आले आहे. ती उपभोगाची वस्तू असल्याचे दाखवून टिंगल-टवाळी करण्यात आली आहे. अशा माध्यमांना धडा शिकवला पाहिजे,'' अशा कठोर शब्दांत आमदार निलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका शनिवारी स्पष्ट केली. दरम्यान, जिल्ह्यातील परिचारिकांसाठीच्या सांस्कृतिक सभागृहासाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना पुणेतर्फे परिचारिका दिन साजरा करून जिल्हा स्तरीय मेळावा घेण्यात आला. या वेळी गोऱ्हे बोलत होत्या. जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजया शिंदे, आरोग्य उपसंचालक डॉ. हनुमान चव्हाण, संघटनेच्या अध्यक्षा राजश्री सादीगले, सरचिटणीस रोहिणी आहेर उपस्थित होत्या.

गोऱ्हे म्हणाल्या, "परिचारिकांना 24 तास काम करावे लागते. त्यातून कामाचा ताण येतो. त्यांच्यासाठी जीम, वाचनालये, सांस्कृतिक केंद्रे स्थापन करण्याची गरज आहे. आरोग्य सेविकांनी रुग्णांची सेवा करण्याबरोबरच आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. रुग्णालयांत त्रास होत असल्यास परिचारिकांनी विशाखा समिती अथवा अन्य संघटनांची मदत घ्यावी.''

माने म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व प्रश्न येत्या काळात सोडविण्यात येतील. आरोग्य विभागाने नेहमीच कौतुकास पात्र ठरेल अशी कामगिरी केली आहे. 25 आरोग्य केंद्रांना नुकतीच एनएबीएच मानांकने आणि 10 आरोग्य केंद्रांना एनक्‍युएएस नामांकने मिळाली आहेत. पुणे जिल्हा परिषद उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्यात राज्यात अग्रस्थानी आहे.''

"जिल्ह्यातील 72 आरोग्य केंद्रांना प्रसूती केंद्रांची मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यात 60 ते 62 प्रसूती होणारी आठ केंद्रे आहेत. लोणी काळभोर आरोग्य केंद्रात महिन्याला 100 प्रसूती होतात,'' असे पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्याः

Web Title: pune news nurse and media nilam gorhe