सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डीसीएफ व्हेंचर यांच्यात करार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डीसीएफ व्हेंचर यांच्यात करार

पुणे - विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शनासह यशस्वी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’ आणि ‘डीसीएफ व्हेंचर’ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवे स्टार्टअप सुरू करण्यापासून, त्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. यातून पुण्यात रोजगार निर्मितीस यातून हातभार लागणार आहे. 

‘रिसर्च पार्क फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम आणि ‘डीसीएफ व्हेंचर’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी पोटलुरी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते. रिसर्च पार्क फाउंडेशन हे उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना जोडण्याचे आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनाला चालना देण्याचे काम करते. व्यावहारिक अनुभव आणि संभाव्य रोजगारासाठी कौशल्य वाढवण्यासाठीही प्रयत्न केला जातो. विद्यापीठाने ‘डीसीएफ व्हेंचर’बरोबर करार केल्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. 

‘डीसीएफ व्हेंचर’ हे मुंबईतील फाउंडेशन आहे. नवसंशोधनासाठी मार्गदर्शन, तसेच राज्य सरकार, शिक्षण संस्था यांच्यासमवेत विकास आणि संशोधन प्रकल्पावर ते काम करते. नवसंशोधनासाठी धोरण ठरविणे, परदेशी संस्थांबरोबर करार करून विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे कामही या फाउंडेशनकडून केले जाते. 

या कराराद्वारे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास आणि उद्योजक बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी सक्षम करण्यासाठी उपक्रम  राबविले जाणार आहेत. 

शाळिग्राम म्हणाले, ‘‘फाउंडेशन आणि डीसीएफ व्हेंचर यांच्यातील करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल. या व्हेंचरबरोबर काम करणाऱ्या उद्योजकांच्या अनुभवाची जोड नव्या स्टार्टअपसाठी मिळेल. यातून तरुण उद्योजक निर्माण होण्याबरोबरच रोजगार निर्माण होण्यास मदत होईल.’’ 

पोटलुरी म्हणाल्या, ‘‘रिसर्च पार्क फाउंडेशन हे संशोधन आणि उद्योजकता विकास आणि विद्यापीठाला प्रथम पाच नावीन्यपूर्ण भारतीय विद्यापीठांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच स्टार्टअप आणि उद्योगासाठी जागतिक स्तरावरील संशोधन सुविधा निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहेत. या सामंजस्य करारानुसार त्यांच्या या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे.’’ 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेवर 
आमचा विश्‍वास आहे. ‘डीसीएफ व्हेंचर’ची क्षमता आणि त्यांचे जागतिक स्तरावरील उद्योग, नवउद्योजक, तज्ज्ञांचे नेटवर्क याचा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे. या करारामुळे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण व्यवसाय निर्माण करण्यासाठी त्यांना कौशल्य देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.  
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाचे नाव हे संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी आघाडीवर आहे. आम्ही एसपीपीयू आणि त्याच्या विद्यार्थ्यांसह कार्य करण्यास उत्सुक आहोत आणि यशस्वी स्टार्टअप सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ या कराराच्या माध्यमातून मिळेल. विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा "नोकरी देणारे' व्हावे, या उद्देशातून फाउंडेशन काम करीत आहे. 
- लक्ष्मी पोटलुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीसीएफ व्हेंचर

विद्यार्थ्यांना होणार लाभ 
विद्यापीठाबरोबर आणि डीसीएफ व्हेंचर्स नेटवर्कमधील गुंतवणूकदारांशी नव्या स्टार्टअपला जोडून देणे. (इन्व्हेस्टर कनेक्‍ट प्रोग्रॅम). 
उद्योजकतेच्या विविध पैलूंशी संबंधित विविध कौशल्ये देण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार. 
परदेशातून होणाऱ्या वस्तूंची आयात कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांची विचारधारा तयार करणे, तसेच आयातीला पर्यायी (इंपोर्ट सबस्टिट्यूट) वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रम या करारामुळे शक्‍य होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com