nursery.
nursery.

नर्सरी व्यवसाय कोमेजला...सरकारच्या मदतीची अपेक्षा...

लोणी काळभोर (पुणे्) : आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे नर्सरी हब असलेल्या पूर्व हवेलीला ऐन हंगामात झालेल्या लॉकडाउनमुळे कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. 

शेतीला जोडधंदा म्हणून पूर्व हवेलीतील सुमारे पाचशे शेतकऱी पुत्रांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून नर्सरी उद्योग सुरू केला. ऐन हंगामात कोरोनामुळे आंतरराज्यीय वाहतूक बंद पडली. त्यामुळे ही शेतकऱ्यांची मुले आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार, वाहतूकदार, परप्रांतीय मजूर असे दहा हजारांहून अधिक लोक देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे. 

उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, आळंदी म्हातोबाचीसह पूर्व हवेलीतील अनेक गावांत दहा वर्षांपूर्वी रोपवाटिकांचा उद्योग सुरू झाला. अल्प काळातच हा उद्योग भरभराटीला आला. वार्षिक उलाढाल हजारो कोटींमध्ये पोचली आहे. येथून महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात रोपे पाठवली जातात. गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक बंद असल्याने, कोट्यवधींचा माल पडून आहे. काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने, तयार रोपे, फुलझाडे वाया जाणार आहेत. 

नर्सरी उद्योगासाठी मार्च ते जून हा हंगाम असतो. वर्षभर तयार केलेली रोपे या काळात देशभरात पाठवली जातात. लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. 
- संतोष शितोळे, माजी अध्यक्ष, 
महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन 

माझ्यासारख्या पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या मुलांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय वाढवला आहे. सरकारने नर्सरी व्यवसायाला मदत करण्याची गरज आहे. सरसकट आर्थिक मदतीची आमची अपेक्षा नाही. आम्ही वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाला एक ते दीड वर्ष मुदतवाढ देण्यासाठी सरकारने मदत करावी. पुढील हंगामासाठी आहे त्याच तारणावर टक्के कर्ज वाढवून देण्याबाबत आदेश द्यावेत, एवढीच अपेक्षा आहे. 
दशरथ ऊर्फ बापू शितोळे, 
मालक, युनिक गार्डन, कोरेगाव मूळ 

नर्सरी उद्योगातील सर्व जण शेतकऱ्यांची मुले आहेत. या उद्योगाला आर्थिक मदत मिळावी व कर्जाला एक ते दीड वर्षासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे. 
अशोक पवार, आमदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com