'MH-12'चा डंका; आनंदी राहण्यात पुणेकर देशात बाराव्या स्थानी; तर राज्यात एक नंबर!

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 7 January 2021

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2020 या कालावधीत 34 शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले. त्यामध्ये प्रत्येक शहरातील 400 जणांचा समावेश होता.

पुणे : एमएच 12 म्हणजे की पुणेकर हे समीकरण निश्‍चित झाले आहेत. आता हेच समीकरण राष्ट्रीय पातळीवर देखील आनंदी राहण्यात पुणेकरांनी बारावा नंबर पटकावला आहे. तर राज्यात मुंबई, नागपूरला मागे टाकत राज्यात सर्वाधिक आनंदी पुणेकरच असल्याचे 'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020' या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर 2020 या काळात देशातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या 34 शहरांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये 13 हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांवरून शहरातील आनंदी शहरे कोणते याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गुरूग्राम येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक असलेले राजेश पिल्लानिया यांनी प्रथमच देशांतर्गत शहरांचे सर्वेक्षण केले आहे. यापूर्वी त्यांनी सप्टेंबर महिन्यात राज्यांचा आनंदी निर्देशांक जाहीर केला होता.

पुणेकरांनो, दहा महिन्यानंतर शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला; ऐतिहासिक वास्तूंकडे वळाले पर्यटक​

देशात आनंदी शहरांच्या यादीमध्ये क्रमांक एकवर लुधियाना, दोनवर अहमदाबाद तर, क्रमांक तीनवर चंडीगड आहे. शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे 34 शहरांच्या यादीत 12व्या क्रमांकावर आहे. 17 व्या क्रमांकावर नागपूर आणि 21 व्या क्रमांकावर मुंबई आहे.

'सकाळ'शी बोलताना प्रा. राजेश पिल्लानिया म्हणाले, "ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2020 या कालावधीत 34 शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले. त्यामध्ये प्रत्येक शहरातील 400 जणांचा समावेश होता. यामध्ये कामाच्या ठिकाणचे वातावरण, कौटुंबिक वातावरण, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, धार्मिक-आध्यामिक वातावरण आणि कोरोनाचा परिणाम या निकषांवर आनंदी निर्देशांक ठरविण्यात आला आहे.''

उपमुख्यमंत्री अजित पवार MPSCमध्ये लक्ष घालणार; रोहित पवारांच्या पत्राला दिला रिप्लाय​

अविवाहित नागरिक जास्त आनंदी
'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020' या सर्वेक्षणात शहरातील नागरिकांचे वयोमान, शिक्षण, प्रत्येक महिन्याचे उत्पन्न, शहरात असणाऱ्या सुखसोई, जीवनशैली याचीही माहिती घेतली. त्यात विवाहित नागरिकांपेक्षा अविवाहित नागरिक खूष असल्याचे दिसून आले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला अशी ही भूमी कायम आनंदीच असणार. पुणे खूप सुंदर शहर आहेच, पण खवय्ये असलेले पुणेकर कला, संस्कृती, साहित्य यामध्ये पुढे आहेतच. कोरोनाच्या काळात पुणेकरांनी एकमेकांना खूप आधार दिला हे शहर आनंदी शहराच्या यादीत राज्यात अव्वल असल्याचा अभिमान आहे.''
- अनुप जोशी, व्यावसायिक

पुण्यातील IISERचे तीन शास्त्रज्ञ Indian Academy of Sciencesचे फेलो

देशातील सर्वाधिक आनंदी शहरे :
1) लुधियाना
2) अहमदाबाद
3) चंडीगड
4) सुरत
5) वडोदरा
6) अमृतसर
7) चेन्नई
8) जयपूर
9) जोधपूर
10) हैदराबाद
11) भोपाळ
12) पुणे
13) नवी दिल्ली
14) देहरादून
15) फरिदाबाद
16) पाटणा
17) नागपूर
18) इंदूर
19) कोच्ची
20) भुवनेश्वर
21) मुंबई
22) गुवाहाटी
23) धनबाद
24) नोएडा
25) जम्मू
26) कानपूर
27) बंगळूरु
28) कोलकाता
29) लखनऊ
30) शिमला
31) रांची
32) गुरुग्राम
33) विशाखापट्टणम
34) रायपूर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ranked 12th Place As Happiest City In India and First In Maharashtra