esakal | पुणेकरांची आता ऑक्सिजनची चिंता मिटली; कशी ते पहा
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

पुणेकरांची आता ऑक्सिजनची चिंता मिटली; कशी ते पहा

sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - शहरात कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या कमी होत आहे. तसेच, रुग्णालयांकडून (Hospital) प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची (Oxygen) केली जाणारी योग्य बचत (Saving) यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा वापर ३६१ मेट्रिक टनांवरून २८० टनांवर आला आहे. कंपन्यांकडून पुरवठाही (Supply) पुरेशा प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाइकांची (Relatives) ऑक्सिजनसाठी होणारी धावाधाव थांबल्याचे दिलासादायक चित्र आहे. (Pune Residents now have oxygen worries)

पुणे विभागातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी सध्या सुमारे ४८५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. लिंडे, आयनॉक्स, टायो निप्पॉन, एअर लिक्विड, आरआयएल, जेएसडब्ल्यू डॉल्वी या कंपन्यांकडून हा पुरवठा सुरू आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ऑक्सिजनचा वापर ३६१ मेट्रिक टनांपर्यंत पोचला होता. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत होती; परंतु त्यानंतर ऑक्सिजनचा वापर ३१० टनांपर्यंत खाली आला.

हेही वाचा: पुणेकरांना मोठा दिलासा; आज कोरोना रुग्णसंख्या तीन अंकी

सध्या हे प्रमाण २८० मेट्रिक टनांवर आले आहे. पुणे वगळता अन्य चार जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पुणे शहरात मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा तीन ते चार हजारांदरम्यान होता. तो चार-पाच दिवसांत दोन हजारांपेक्षा कमी झाला आहे. प्रशासनाकडून रुग्णालयांमधील ऑक्सिजन वापराचे ऑडिट सुरू आहे. केवळ ऑडिटमुळे रुग्णालयांमध्ये सुमारे २० मेट्रिक टन ऑक्सिजनची बचत झाली आहे. रुग्णसंख्येत घट आणि ऑक्सिजनचे ऑडिट यामुळे मागणीत घट झाली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, ऑक्सिजन कंपन्यांमधील तांत्रिक बिघाड आणि वाहतूक व्यवस्थेत जाणारा वेळ पाहता किमान एक दिवस पुरेल इतका अतिरिक्त साठा असणे गरजेचे आहे, असे मत प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

हेही वाचा: सीरम इन्स्टिट्यूट मध्ये होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

‘सीएसआर’मधून ऑक्सिजन प्लांट

एका ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून सुमारे ५० रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होतो. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये असे ६० नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करण्यात येत आहेत. टाटा, बजाज फायनान्स, मर्सिडीज बेंझ यांसह अन्य कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून काही प्लांट सुरू झाले आहेत. तसेच, ऑक्सिजन कॉन्सट्रेटरही प्राप्त झाल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

जिल्हानिहाय ऑक्सिजनची गरज आणि पुरवठादार कंपन्या (टनांमध्ये)

  • पुणे - २८० - लिंडे, आयनॉक्स, टायो निप्पॉन, आरआयएल, एअर लिक्विड

  • कोल्हापूर - ४५ - आयनॉक्स, टायो निप्पॉन, कोल्हापूर, जेएसडब्ल्यू

  • सांगली - ५४ - लिंडे, आयनॉक्स, एअर लिक्विड, टायो निप्पॉन

  • सातारा - ५३ - आयनॉक्स, लिंडे जेएसडब्ल्यू डॉल्वी,

  • सोलापूर - ५३ - लिंडे, आयनॉक्स, टायो निप्पॉन, एअर लिक्विड