esakal | पुणे : नदीतील जलपर्णीच्या कामात गोलमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Jalparni

पुणे : नदीतील जलपर्णीच्या कामात गोलमाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातून वाहणाऱ्या नदीतील जलपर्णी (River Jalparni) बाहेर काढून ती डंपरने इतर ठिकाणी नेऊन टाकण्यासाठी महापालिकेने निविदा (Municipal Tender) मंजूर केली आहे. मात्र प्रत्यक्षात ती कापून नदीतून पुढे ढकलण्यात येत आहे. महापालिकेतील अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराचे हे गौडबंगाल पाणी फुगवठ्यास कारणीभूत ठरत आहे. निविदेत स्पष्ट पणे उल्लेख असतानाही महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी मात्र ही जलपर्णी काढणे अशक्य असल्याचे सांगत आहे. जर काढणे अशक्य होते तर निविदेत उल्लेख कसा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Pune River Jalparni Work Scam)

पुणे शहरातून मुठा नदी वाहते. नदीमध्ये मैलामिश्रित पाणी येत असल्याने ते जलपर्णी वाढण्यासाठी पोषक ठरत आहे. यामुळे नदीतील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याने ती पूर्ण नष्ट करण्यासाठी नदीतून बाहेर काढणे आवश्‍यक आहे. मुठा नदीत खडकवासल्यापासून अनेक ठिकाणी जलपर्णीने पात्र भरलेले आहे. तसेच मुळा नदीत पिंपरी-चिंचवड भागातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येते.

हेही वाचा: तरुणामुळं ट्रॅफिकचा खेळखंडोबा! कारण ऐकून थक्क व्हाल

ही जलपर्णी काढण्यासाठी पुणे महापालिकेने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यात नदीतील जलपर्णी स्पायडर मशिनने बाहेर काढून डंपरद्वारे इतरत्र टाकणे अनिवार्य आहे. पाषाण आणि कात्रज येथील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ५० लाखांची निविदा मंजूर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून जात असल्याचे पाहायला मिळत होते. अनेकदा ही जलपर्णी डेक्कन परिसर, ओंकारेश्वर येथील घाट परिसरात अडकलेली दिसते. त्यातच खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येऊन भिडे पूल येथे अडकते. कालच्या भिडे पुलावरील घटनेने या प्रकाराची पोलखोल केली होती.

हेही वाचा: पुणे : जादा परताव्याचे आमिष वृद्धास पडले महागात

मशिनसाठी प्रतितास तीन हजारांचा खर्च

जलपर्णी काढण्यासाठी स्पायडर ए-९१ व आर-६५ मशिन वापरली जाते. त्यासाठी ही मशिन वापरासाठी महापालिका प्रतितास ३ हजार ३७४ रुपये ठेकेदारास देत आहे. काढलेली जलपर्णी वाहून नेण्यासाठी डंपरच्या प्रत्येक फेरीसाठी ५१३ रुपये खर्च आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या बिगाऱ्यास दिवसाला ७२३ रुपये मजुरी दिली जात आहे. या दरानुसार वर्षभर काम केल्यास ९८ लाख ४० हजार रुपये दिले जाणार आहेत.

जलपर्णी काढणे अशक्य

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी जलपर्णी काढणे शक्य नाही, त्यातून वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे जलपर्णी कापून पुढे ढकलून दिली जाते, त्यासाठीच ही निविदा काढली असल्याचा खुलासा शुक्रवारी केला होता. मात्र, ‘सकाळ’कडे उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये जलपर्णी जेटिंग मशिनने बाहेर काढणे व डंपरद्वारे ती इतर ठिकाणी टाकणे यासाठीच निविदा काढली असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी प्रत्येक तासाच्या हिशेबाने ठेकेदाराला पैसे दिले जाणार आहेत. याबाबात शनिवारी खेमणार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा: शंभर विद्यार्थ्यांनी पूर्ण केला ‘रिसर्च एथिक्स’चा अभ्यासक्रम

जलपर्णी कापल्याने ती निघून जात नाही, त्याचे मूळ दोन फूट खाली असते. त्यामुळे जलपर्णीला रोखता येणार नाही. जलपर्णी काढण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ज्ञांना सोबत घेऊन आराखडा तयार केला पाहिजे.

- मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष, आप

loading image
go to top