esakal | पुणे: कचरा कुजविण्यासाठी तब्बल १०,६०० रुपये किलोची पावडर
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महानगरपालिका

पुणे: कचरा कुजविण्यासाठी तब्बल १०,६०० रुपये किलोची पावडर

sakal_logo
By
ब्रीजमोहन पाटील

पुणे: शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे अनेक प्रकल्प उभारले आहेत, पण आता प्रकल्पांवर पडलेल्या हजारो टन कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी व कचरा कुजवून खत करण्यासाठी घनकचरा विभागाने तब्बल १० हजार ६०० रुपये किलो या दराने पावडर खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी खास पेटंट असलेली पावडर अत्यावश्यक काम दाखवून विना निविदा खरेदी केली आहे. ही महागडी पावडर खरेदी सध्या महापालिकेत चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा: पलायन केलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा, मृत जनावरांचा वास येऊ नये म्हणून, महापालिकेतर्फे अॅरोबिक सिटी वेस्ट पावडर पाण्यातून फवारली जाते. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून देखील मोठी मागणी असते. २०१७ पासून महापालिकेने दरवर्षी १९८ रुपये किलो दराने पावडर खरेदी केलेली आहे.

यंदाच्या वर्षासाठी २५ लाख रुपयांची पावडर खरेदी करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली, पण भांडार विभागाने अद्याप त्याची वर्क ऑर्डर दिलेली नाही, असे असतानाच आता बायो विझार्ड ही पावडर खरेदी गतीने खरेदी केली जात असून, भांडार विभागामार्फत ५० लाख रुपयांची पावडर खरेदीस स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

विना निविदा खरेदी

महापालिकेचे हडपसर येथे २०० टन, सूस रस्ता २०० टनचा प्रकल्प आहे. १३ बायोगॅस प्रकल्प सुरू असून, काही निविदा प्रक्रियेमुळे बंद आहेत. समाविष्ट गावातून रोज २०० टन कचरा तयार होत आहे. या ठिकाणांवरून दुर्गंधीबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे ही बायो विझार्ड या पावडरचे पेटंट असलेल्या मे. झेनिथ मायक्रो कंट्रोल या कंपनीकडून पावडर खरेदीसाठी मान्यता घेतली आहे.

हेही वाचा: 'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'

ही खरेदी अत्यावश्‍यक असल्याचे दाखवून निविदा काढण्याची गरज पडू नये म्हणून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील अनुसूची - ड प्रकरण ५-२ (२) या नियमाचाआधार घेण्यात आला आहे. १० हजार ६०० रुपये किलो दराने ४७१ किलो पावडर खरेदी केली जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

दोन्ही पावडरमध्ये फरक काय ?

अॅरोबिक पावडर आणि बायो विझार्ड पावडर यांचे काम कचऱ्याची दुर्गंधी कमी करणे व खत तयार करणे हेच आहे. एक किलो अॅरोबिक पावडरची १ मेट्रीक टन कचऱ्यावर फवारणी होऊ शकते. याचा वापर क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात विविध ठिकाणी केला जातो. तर, बायो विझार्ड पावडर ही एका किलोत सुमारे ५० टन कचऱ्यावर फवारता येते. फवारणी झाल्यानंतर पुढील दोन आठवड्यात कचऱ्याचे खत तयार होते. दुर्गंधी पसरत नाही, असा दावा करण्यात आला आहे.

‘‘ही पावडर महाग वाटत असली तरी ती तेवढीच परिणामकारक आहे. पूर्वीची पावडर एका किलोत एकाच टनावर प्रक्रिया करत होती, बायो विझर्ड पावडर एका किलोत ५० टनापेक्षा जास्त कचऱ्यावर वापरता येते. या पावडरची चाचणी करण्यात आली असून, त्यानंतर खरेदीचा निर्णय घेतला आहे. ’’- अजित देशमुख, प्रमुख, घनकचरा विभाग

loading image
go to top