Share Market Scam : शेअर बाजारातील नफ्याचे आमिष; अनेकांना लाखोंचा गंडा.. ‘इन्फ्लुएन्सर’चं नाव वापरुन केली फसवणूक

Financial Scam : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरभक्कम फायदा कमावण्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे लोकांनी अशा जाहिरातींपासून सावध राहणे गरजेचे आहे.
Share Market Scam
Share Market ScameSakal

Pune Share Market Scam : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगार नवनवी तंत्रे वापरून आर्थिक फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. यात अशाच एका नव्या तंत्राची भर पडली असून, सायबर गुन्हेगार आता आर्थिक क्षेत्रातील ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’च्या नावाचा, फोटोचा गैरवापर करून फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरभक्कम फायदा कमावण्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे लोकांनी अशा जाहिरातींपासून सावध राहणे गरजेचे आहे.

अशा जाहिरातींमध्ये प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे नाव, फोटो वापरून शेअर बाजारात गुंतवणूक करून भरभक्कम पैसा मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात आहे. शेअरच्या टीप मिळविण्यासाठी एका लिंकवर क्लिक करून, व्हॉटसअ‍ॅप समूहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवरून अशा प्रकारचे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत.

या जाहिराती एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या नावे असतात, त्यात ‘स्पॉन्सर्ड’ असे लिहिलेले दिसते. मात्र, प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो आणि नाव बघून लोकांचा या जाहिरातींवर सहज विश्वास बसत आहे, आणि झटपट पैसे मिळविण्याच्या मोहाने या जाहिरातींना भुलून अनेकांनी पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांपर्यतच्या रकमा दिल्या असून, त्या गमावल्याचे समोर येत आहे. आर्थिक क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर सीए रचना रानडे यांच्या नावाने समाजमाध्यमांवर बनावट जाहिराती करून अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे आढळले आहे.

Share Market Scam
Pune Crime News : डॉक्टरला स्वर्ग, पुण्य पडले पाच कोटींना ; विविध आमिषे दाखवून पाच जणांकडून फसवणूक

सायबर पोलिसांकडे तक्रार

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रचना रानडे यांचा फोटो आणि नावाचा वापर करून वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर जाहिराती दिसून येत आहे. विशेषतः फेसबुकवर अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या जाहिरातींना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. आता तर लोकांच्या घरी जाऊन, बनावट ओळखपत्रांच्या आधारे, थेट रचना रानडे यांच्याकडून आल्याचे सांगून काही लोक पैसे उकळत असल्याचेही आढळल्याचे रचना रानडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, ‘मेटा’ कंपनीशी संपर्क साधून उपाययोजना करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

फसवणूक झाल्यास काय करायचं?

तत्काळ १९३० किंवा १५५२६० या क्रमांकावर तक्रार नोंदवा.

सायबर क्राईम पोर्टलवर, नजिकच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदवा.

लोकांनी अशा कोणत्याही जाहिराती बघून संपर्क करण्यापूर्वी किंवा पैसे देण्यापूर्वी दिलेली लिंक सुरक्षित आहे का, खरी आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. पैसे मागितले म्हणून लगेच पाठवू नयेत. कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करू नये.

-शिरीष देशपांडे (सायबर गुन्हेविषयक तज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com