Pune : सिमला ऑफिसजवळ ‘कोंडी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shimala Office Chowk
पुणे : सिमला ऑफिसजवळ ‘कोंडी’

पुणे : सिमला ऑफिसजवळ ‘कोंडी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पादचाऱ्यांसाठी लावलेले बॅरिकेड उखडल्यामुळे सिमला ऑफिस चौकातून रस्ता ओलांडणे विद्यार्थी-नागरिकांसाठी धोकादायक झाले आहे, असे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत गुरुवारी आढळून आले. या चौकात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनांची गरज असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेंजहिल्स-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला सिमला ऑफिस चौकात प्रारंभ झाला आहे. त्यासाठी संबंधित रस्त्यावर पत्रे लावले आहेत. त्याच्याशेजारून पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी प्लॅस्टिकचे बॅरिकेड लावले होते. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना सुरक्षितता मिळत होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील पदपथांवरील बॅरिकेड उखडले आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. सिमला ऑफिस चौकात, तसेच आकाशवाणीलगत अनेक शासकीय कार्यालये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आहेत. सिग्नल सुरू असताना भारत इंग्लिश मीडियम शाळा व त्यासमोरील बसस्टॉपवर जाण्यासाठी पादचारी, विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा पादचारी आणि विद्यार्थ्यांना सिग्नलला थांबलेल्या गाड्यांमधून वाट काढत जावे लागते. दिवाळीच्या सुट्यानंतर बऱ्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पादचाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षितता निर्माण करण्याची गरज आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण

सिमला ऑफिस मार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि गर्दी असते. रस्ता सध्या अरुंद झाल्यामुळे वाहनांची गर्दी वाढली आहे. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र लेन नसल्यामुळे गैरसोय होत आहे. रस्ता ओलांडायची भीती वाटत आहे.

- अविनाश ठोंबरे, नागरिक

मेट्रोच्या बॅरिकेडमुळे सिमला ऑफिस चौकात तीव्र वळण तयार झाले आहे. यामुळे वाहनचालकांना पादचारी दिसत नाही. पादचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी लेन उपलब्ध करून द्यावी.

- हरिदास जाधव, नागरिक

चौकात काही महिन्यांपूर्वी बॅरिकेड होते. दररोजच्या गर्दीमुळे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे ते तुटले, त्यांची नियमितपणे दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पदपथ नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास अडचणी येतात. शिवाय, चौकातील वळण धोक्याचे आहे.

- उज्ज्वला पिंगळे, मुख्याध्यापिका, भारत इंग्लिश विद्यालय

पीव्हीसी बॅरिअर लावले होते, पण दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करून बॅरिकेडमधून जातात, त्यामुळे ते तुटतात. वारंवार बसवलेले बॅरिकेड चोरीस जातात अथवा तोडले जातात. तेथे लोखंडी बॅरिकेड लावू शकत नाही.

- फरहान हसन, साइट इन्चार्ज, मेट्रो

सिमला ऑफिसजवळील चौक पादचाऱ्यांसाठी खरोखरच सुरक्षित आहे का?

आपले मत नावासह पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा ः ८४८४९७३६०२

loading image
go to top