#PuneTheater जोशी नाट्यगृहात प्रयोग होणार कधी?

बाबा तारे 
गुरुवार, 7 जून 2018

औंध - औंध परिसरातील प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग करायला कोणी स्वारस्य दाखवत नाहीत. कारण काय? तर अपुरी रंगमंच व्यवस्था. त्यातही स्वच्छतागृहाच्या अपुऱ्या सुविधेमुळे कलाकारही इकडे फिरकत नाहीत. नाट्यगृह बांधले मात्र ते बांधण्याचा हेतू साध्य झाला नसल्याची परिस्थिती आहे.  

औंध - औंध परिसरातील प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग करायला कोणी स्वारस्य दाखवत नाहीत. कारण काय? तर अपुरी रंगमंच व्यवस्था. त्यातही स्वच्छतागृहाच्या अपुऱ्या सुविधेमुळे कलाकारही इकडे फिरकत नाहीत. नाट्यगृह बांधले मात्र ते बांधण्याचा हेतू साध्य झाला नसल्याची परिस्थिती आहे.  

उपनगरांतील प्रेक्षकांसाठी औंधमध्ये महापालिकेने २०१३ मध्ये हे नाट्यगृह बांधले. या नाट्यगृहातील रंगमंचाची जागा अपुरी आहे. या कारणास्तव नाट्यगृहाकडे येण्यास नाटक कंपन्या नाक मुरडतात. सर्वसाधारण दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शाळांच्या कार्यक्रमावर कसबसा नाट्यगृहाचा खर्च भागविण्यात येतो. त्यातच महिन्याचे वीजबिलही लाखाच्या घरात येते. वस्तुतः औंध, बाणेर परिसरात गेल्या काही वर्षांत लोकवस्ती विस्तारली आहे. नाटक पाहण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हाच पर्याय राहू नये, यासाठीच या ठिकाणी नाट्यगृह बांधण्यात आले.  उत्पन्नाअभावी नाट्यगृह चालत नसून, नाटक कंपन्या, कलाकार, महापालिकास्तरावरच याबाबत एकूणच उदासीनता दिसते. तेथील देखभालीवरही महापालिकेला खर्च करावा लागतो. याबाबत नाट्यगृहाचे व्यवस्थापक संतोष डुबे म्हणाले, ‘‘येथे नाटकांचे प्रयोग होत नसले, तरीही अन्य कार्यक्रम होत असतात. त्यामुळे नियमित उत्पन्न मिळते. मागील वर्षी जवळपास २८५ कार्यक्रम झाले. त्यातून महापालिकेला ३६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. येथे एकपात्री प्रयोग, पुरस्कार वितरण, कार्यशाळा, संमेलने आदी कार्यक्रम होतात. नाटकांचे प्रयोग मात्र होत नाहीत. देखभालीचा खर्च अन्य कार्यक्रमांच्या उत्पन्नातून भागवावा लागतो.’’  

पं. भीमसेन जोशी नाट्यगृहामध्ये तांत्रिक सुविधाही पुरेशा नाहीत. या ठिकाणच्या रस्त्यावरचे पार्किंगही प्रेक्षकांना येण्याजाण्यास अडथळा ठरते. सध्यातरी येथे नाटकांचे प्रयोग करायला कोणतीच संस्था तयार नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद कितपत मिळेल, यावरही अनेक बाबी अवलंबून असतात. 
- माधव किल्लेदार, नाट्य कलावंत  

Web Title: Pune Theatre Issue Pt Bhimsen Joshi Theater aundh