esakal | पुण्यातील ‘टिळक टँक’ची पाणीदार ९९ वर्षे

बोलून बातमी शोधा

Tilak Water Tank

पुण्यातील ‘टिळक टँक’ची पाणीदार ९९ वर्षे

sakal_logo
By
अमित गोळवलकर @amitgSakal

३० एप्रिल १९२२. हेच ते वर्ष. हो. टिळक टँक सुरू झाला. आदल्याच वर्षी त्याचं भूमिपूजन झालं होतं. अवघ्या पुणेकरांनी त्या वर्षी तोंडात बोटं घातली असतील. टँक? तोसुद्धा पोहण्यासाठी? हो... तो काळच तसा होता. स्वातंत्र्यलढ्यानं भारलेली पिढी होती ती. पण त्यातही निघाले काही द्रष्टे. देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं तर पुढली पिढी बलवान हवी हे ध्येय बाळगणारे...! त्यांच्या कल्पनेतून सुरू झालेला लोकमान्य टिळक तलाव आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतो आहे.

डेक्कन जिमखान्याची स्थापना १९०६ मध्ये झाली. त्यानंतर जिमखान्यावर स्वप्न पाहिलं गेलं ते भारतीय खेळाडू ऑलिंपिकला पाठविण्याचं. सर दोराबजी टाटा यांच्या पुढाकारानं जिमखान्यावर पहिली बैठक झाली आणि १९२० च्या अँटवर्प ऑलिंपिकला भारतीय खेळाडू गेलेसुद्धा. इंडियन ऑलिंपिक संघटनेची स्थपनासुद्धा येथेच झाली. त्याआधी जिमखान्यावर झालेल्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धांचा खर्च भागविण्यासाठी जिमखान्याने शिरोळे पाटलांकडून लिजवर काही अतिरिक्त जागा घेऊन तिथं प्लॉट पाडले आणि डेक्कन जिमखाना वसाहत आकाराला आली. या वसाहतीच्या बंगल्यांसाठीचे दगड जवळच असलेल्या दगडाच्या खाणीतून मिळाले.

या खाणीत नैसर्गिक पाणी लागलं आणि बी. एन. भाजेकर, एल आर. भाजेकर, एस. आर. भागवत, साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांसारख्या जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना सुचली ती जलतरण तलाव बांधण्याची. हा केवळ विचार राहिला नाही तर एप्रिल १९२१ मध्ये भूमिपूजन करून कामाला सुरुवातही झाली. पुढच्या वर्षभरात तलावाचे काही काम पूर्ण झालं आणि गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल, १९२२ ला तलावाचा काही भाग पोहण्यासाठी खुला करण्यात आला. त्याचं उद्‍घाटन (कै.) तात्यासाहेब तथा न. चिं. केळकर यांच्याच हस्ते झालं. कै. केळकर त्यावेळी पूना म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष होते. ज्यांच्या प्रेरणेतून हा तलाव उभा राहिला त्या लोकमान्यांचं नाव तलावाला देण्यात आलं. महिलांसाठी वेगळा विभाग असणारा हा त्याकाळचा एकमेव जलतरण तलाव.

हेही वाचा: केंद्र सरकार ग्रामसभांचे अधिकार नाकारतेय काय? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

त्या वेळी जिमखान्याचे असलेले सभासद कुठे आयसीएस, इंजिनिअर अशा मोठ्या हुद्द्यांवर काम करणारे. त्यामुळे या तलावाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण अशीच झाली. हा तलाव रस्त्यापासून खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे खाणीतल्या झऱ्यातून आलेले अतिरिक्त पाणी शेजारीच असलेल्या कॅनाॅलमध्ये आणि तिथून थेट नदीत सोडण्याची व्यवस्था केली गेली, जी आजपर्यंत अस्तित्वात आहे. डेक्कन जिमखान्याच्या मैदानाला पाणी लागते हे लक्षात घेऊन पुढच्या काळात तलावापासून जिमखान्याच्या मैदानापर्यंत पाणी पंप करून नेण्याची व्यवस्था केली गेली. त्यामुळे जिमखाना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

रामचंद्र मुजूमदार, सदूभाऊ गोडबोले, जे. व्ही. ओक, पी. पी. जोशी, शंकरराव लागू, राजाभाऊ नरवणे, राजाभाऊ भिडे, बुवा रिसबूड, सुरेश (मायकेल जोशी) या व अशा प्रशिक्षकांच्या हाताखाली शिकलेली माणसं आजही भेटतात. अशाच प्रशिक्षकांच्या हाताखाली तयार झालेल्या पुढच्या पिढ्यांनी जलतरण प्रशिक्षणाचं काम नेटानं सुरु ठेवलं आणि आजही सुरू आहे. जलतरणाबरोबरच या तलावानं परंपरा जपली ती वॉटरपोलोचा खेळ पुढे नेण्याची. सत्तरच्या दशकात इथले वॉटरपोलोचे सामने पाहायला क्रिकेट सामन्यांप्रमाणे गर्दी व्हायची.

नंतर कालौघात तलावाचं नूतनीकरण झालं. ५० मीटरचा आठ लेनचा ऑलिंपिक दर्जाचा तलाव बांधला गेला. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात उरलेल्या जुन्या भागात स्लॅब घालून २५ मीटरचा आठ लेनचा आणखी एक तलाव तयार झाला. ज्यांना केवळ पाण्यात चालायचंय त्यांच्यासाठी ‘वॉकिंग पूल’ तयार केला गेला. संपूर्ण तलावासाठी सौर ऊर्जेची पॅनेल बसवली गेली. नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आणि नैसर्गिक ऊर्जा यावर चालणारा हा भारतातला पहिला जलतरण तलाव बनला.

हेही वाचा: Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

गेल्या वर्षी कोरोनाची साथ आली आणि तलाव बंद झाला. पण त्या काळातही डेक्कन जिमखान्याच्या व्यवस्थापनानं सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम पूर्ण केलं. ज्यांनी तलावासाठी आपल्या जिवाच पाणी केलं त्यातले अनेक जण आज आमच्यात नाहीत. पण त्यांच्या स्मृती चिरकाल मनात राहतील हे निश्चित. आज तलावाचं शताब्दी वर्ष सुरू होतंय. या दिवशीही सरकारी निर्बंधांमुळे तलाव बंदच आहे. पण तरीही इथले प्रशिक्षक, जलतरणपटू आणि त्यांचे पालक, तलावाचा स्टाफ यांच्या मनातली ऊर्जा कणभरही कमी झालेली नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा त्याच तडफेने हे सगळे जण तलावावर असतील हे निश्चित. कारण या तलावामागं ऊर्जा आहे ती लोकमान्यांची. त्यांच्या ‘पुनश्च हरी ओम’ या मंत्राची!

नैसर्गिक झऱ्यांची साथ

वास्तविक तलावाचे काम १९१३ मध्ये करायचे असे उद्दिष्ट त्या काळच्या मंडळींनी ठेवलं होतं. त्यासाठी चक्क डिबेंचर्सही काढले होते. पण दुसऱ्या महायुद्धाचं संकट आडवं आलं आणि हे काम लांबलं. पण जे करायचं ते भव्य असंच करायचं हा ध्यास घेतलेल्या त्या मंडळींनी संधी मिळाली तेव्हा काम हाती घेतलं. तेव्हा उद्दिष्ट ठेवलं ते १०० यार्ड लांबीचा तलाव करण्याचं. आणि ते काम पूर्णही केलं. नैसर्गिक झऱ्यांची साथ लाभलेला मानवनिर्मित एवढा मोठा तलाव बहुधा संपूर्ण आशिया खंडात नसावा.

घडविले अनेक जलतरणपटू

पूर्वी जिमखाना गावाबाहेर. पण आता मध्यवस्तीत आलेला. ज्यावेळी तलाव बांधला त्यावेळी पोहणे शिकवणे, पोहण्याच्या शर्यती घेणे आणि जीवरक्षणाचं प्रशिक्षण अशी तिहेरी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आली होती. हा वसा न टाकता पुढची ९९ वर्षं या तलावानं आपलं कार्य पार पाडलं. पुण्याच्या अनेक कुटुंबातल्या पिढ्या याच तलावावर पोहणे शिकल्या. शेकडो जलतरणपटू या तलावानं घडवले. या तलावाच्या १२ जलतरणपटूंना श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. यातले अनेकजण आंतरराष्ट्रीय पातळीवरही चमकले.