मोठी बातमी: पुणे विद्यापीठाच्या परीक्षेची प्रक्रियाच ठप्प; ना बैठका ना निर्णय!

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 2 March 2021

ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नवी एजन्सी निवडण्याची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये विद्यापीठातील अधिकारी आणि व्यवस्थापन सदस्य यांच्यामध्ये मतमतांतरे आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या, पण त्यानंतर निर्माण झालेले पेच सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून कोणतेही पाऊल अद्याप उचललेले नाही. परीक्षेच्या नियोजनासह निविदा प्रक्रियेसाठी बैठका झालेल्या नाहीत, त्यामुळे निर्णय देखील घेतलेले नाहीत. परिणामी विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ वाढतच चाललेला आहे.

पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा १५ मार्चपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय ९ फेब्रुवारी रोजी परीक्षा संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर उपसमितीचा अहवाल तीन दिवसात आल्यानंतर पुढील काही दिवसात परीक्षा कशी होणार याचे सविस्तर परिपत्रक परीक्षा विभागाकडून काढले जाणार होते. उपसमितीने अहवाल सादर करून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही.

आयेशाच्या समोरच पती मारायचा गर्लफ्रेंडशी गप्पा; डिप्रेशनमध्ये गमावलं बाळ​

तसेच ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नवी एजन्सी निवडण्याची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये विद्यापीठातील अधिकारी आणि व्यवस्थापन सदस्य यांच्यामध्ये मतमतांतरे आहेत. सदस्यांकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पर्चेस कमिटीची एक बैठक देखील झाली. पण अजूनही ठोस निर्णय विद्यापीठाने जाहीर केलेला नाही. तर, या सर्व प्रक्रियेबाबत परीक्षा विभागाला कोणतीही सूचना आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, नवीन एजन्सी नेमण्याची प्रक्रिया करून संबंधित कंपनीला तयारी करण्यासाठी वेळ देणे यामुळे किमान एक महिना परीक्षा पुढे जाऊ शकते. प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी एवढा उशीर होत असताना विद्यापीठाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने गोंधळ वाढत चाललेला आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा राहणार बंद​

परीक्षा मंडळाची बैठक आवश्‍यक
उपसमितीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी याचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक होणे अपेक्षीत होते, पण अद्याप बैठक झालेली नाही, असे उपसमितीचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले. तसेच पुणे विद्यापीठाने फक्त ऑनलाइन परीक्षेचाच निर्णय घेतला होता. पण उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने परीक्षा होतील असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुणे विद्यापीठाला बदल करून घ्यावा लागणार असल्याने परीक्षा मंडळाची बैठक घेणे आवश्‍यकच आहे. पण कधी होणार याबाबत स्पष्टता आलेली नाही.

रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'​

अंतर्गत विभागाच्या परीक्षा झाल्या
पुणे विद्यापीठाच्या परिसरातील अंतर्गत विभाग पूर्णता स्वायत्त असल्याने त्यांनी द्वितीय तिसऱ्या सत्राच्या परीक्षा डिसेंबर-जानेवारी घेऊन चौथ्या सत्राचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांबाबत निर्णय घेता येत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University announced dates of exam but no action taken yet confusion between management