पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन होणार? सस्पेन्स कायम

students_exam
students_exam

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे फेब्रुवारी महिन्यात प्रथम सत्राच्या परीक्षा होणार आहेत. त्या ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत अद्याप विद्यापीठाचा निर्णय गुलदस्त्यात आहे. गुणवत्ता राखण्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याचा एक मतप्रवाह असताना कोरोनाचा प्रादुर्भाव, थेट परीक्षेतील येणाऱ्या अडचणींमुळे ऑनलाइन परीक्षा होऊ शकते, असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये प्राधान्याने प्रात्यक्षिकांचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठासह महाविद्यालयांकडून सुरू आहे. प्रथम सत्राचा जवळपास सर्वच अभ्यासक्रम संपला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांकडून प्रथम सत्राच्या परीक्षांचे नियोजन पूर्ण केले असून, काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. पण अद्याप पुणे विद्यापीठाकडून याबाबत स्पष्टता आलेली नसल्याने विद्यार्थ्यांकडून याबाबत चौकशी केली जात आहे. दरम्यान, काही संघटनांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना अंतिम वर्ष आणि बॅकलॉग परीक्षेप्रमाणे प्रथम सत्राची नियमित परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी केली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, "गुणवत्ता राखण्यासाठी ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, पण परिस्थिती योग्य नसल्यास ऑनलाइन वैयक्तिक उपकरणांऐवजी महाविद्यालयांच्या संगणक प्रयोगशाळेत प्राध्यापकांच्या उपस्थितीत घेतली जावी. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात येणाऱ्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली, त्यामध्ये प्रश्‍न काढताना गुणवत्ता राखली जाईल याकडे लक्ष द्यावे, चुका टाळाव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.''

"वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्यापरिषदेशी संबंधित अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक पुढच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता ही परीक्षा प्रॉक्‍टर्ड पद्धतीने ऑनलाइन घेणे योग्य ठरेल. पण याबाबतचा अंतिम निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत होईल,'' असे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.

मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, "सध्या तरी ऑफलाइन परीक्षेची चर्चा सुरू आहे, पण परीक्षा कशी होणार यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.

विद्यार्थी संघटनांची कोलांटीउडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. त्यासाठी सोशल मीडियातून मोहीम देखील चालवली होती. मात्र, परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाले, अनेक अभ्यासक्रमांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. यात विद्यार्थ्यांचा फायदा असल्याने दोन महिन्यातच विद्यार्थी संघटनांनी भूमिका बदलून आता ऑफलाइन नको ऑनलाइनच परीक्षा घ्या, अशी मागणी लावून धरली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com