विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; पुणे विद्यापीठ 'अशी' घेणार परीक्षा!

ब्रिजमोहन पाटील
Friday, 28 August 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत 'यूजीसी'ने निर्देश दिल्यानंतर पुणे विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरू केली होती. यामध्ये बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय करण्यात आला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश परीक्षांसाठी वापरलेल्या 'प्रॉक्टर्ड' या प्रणालीचा वापर करून अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास प्राधान्य देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सुरक्षित वातावरणात परीक्षा देणे शक्य होणार आहे. दरम्यान, इतर पर्यायांचाही विचार केला जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२८) दिला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी निर्णयाचे स्वागत केले. 

अबुधाबीतील कंपनी विकसित करणार 'डीएसके ड्रीम सिटी'; प्रस्ताव न्यायालयात सादर​

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत 'यूजीसी'ने निर्देश दिल्यानंतर पुणे विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरू केली होती. यामध्ये बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय करण्यात आला. त्यासाठीचा विद्या परिषद, परीक्षा मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच ही मंजूरी घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामाला गती येणार आहे. 

डॉ. करमळकर म्हणाले, "पुणे विद्यापीठाने परीक्षेचे सूत्र कसे असावे याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. त्यासाठी आता स्वतंत्र ठराव करण्याची गरज नाही. केवळ परीक्षेसाठी कोणते माध्यम असावे याचा निर्णय घेतला जाईल. चार ते पाच महिने गेल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून अभ्यासासाठी सुमारे दीड महिना इतका वेळ दिला जाईल. त्या काळात परीक्षेची तयारी देखील केली जाईल. 

वडिलांच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत 'त्या' कार्यकर्त्याने केला प्लाझ्मा दान अन् वाचवला एकाचा जीव!

पुणे विद्यापीठाने पदवी प्रवेश परीक्षेसाठी 'प्रॉक्टर्ड' प्रणालीचा वापर केला होता. त्यात सुमारे तेराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात कोणतीही अडचण आली नव्हती. याच पद्धतीने पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेतल्या जातील, त्यासाठी सुमारे ३१ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे 'प्रॉक्टर्ड' प्रणालीचा वापर करून अंतिम वर्ष परीक्षांसाठी ऑनलाइनचा पहिला पर्याय असेल. इतर पर्यायांचाही विचार केला जाईल. 

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आम्ही या निर्णयाचा अभ्यास करू आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि शैक्षणिक बाबी लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल तसेच महाविद्यालयांना निर्देश दिले जातील."
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परीक्षा घेतली जाईल. मार्चपासून बराच वेळ गेला असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जाईल. विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करून प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या घेतल्या आहेत. त्याचा विचार या परीक्षेसाठी केला जाईल. "
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University will conduct final year exams online using the Proctard system