esakal | व्यापाऱ्यांतील दोन गटांमुळे पुण्यातील फूल बाजार अडकला कचाट्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

building.jpg


प्रशासन संभ्रमात; बांधकाम पूर्णत्वाची प्रतीक्षा कायम 

व्यापाऱ्यांतील दोन गटांमुळे पुण्यातील फूल बाजार अडकला कचाट्यात 

sakal_logo
By
प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करून 11 मजली इमारत उभारली जात आहे. यात अद्यावत फूल बाजार होणार आहे; मात्र या बाजारातील दोन संघटनांच्या वेगळ्या भूमिकांमुळे प्रशासन गोंधळात पडले आहे. फुलबाजार खालच्या मजल्यावर असावा की वरच्या मजल्यावर यावरून दोन गट तयार झाले आहेत. 

राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल​

फूल बाजारातून बाजार समितीला मिळणारे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी पाच व सहा मजल्यांवरील गाळे व्यावसायिक वापरासाठी लिलाव पद्धतीने द्यावे लागतील. तसेच फूल विक्रेत्यांनाही खालचे गाळे लिलाव पद्धतीने देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यातून इमारतीचा खर्च वसूल करून उत्पन्नही मिळू शकेल. त्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले. 

अन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत!​

नवीन फूल बाजारात 141 अडत्यांना गाळे दिले जाणार आहेत; मात्र या गाळ्यांसाठी 235 जण प्रतीक्षा यादीत आहेत. इमारतीचे सध्या चार मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या दोन मजल्यांवर जागा द्या, अशी फूल विक्रेत्यांच्या एका गटाची मागणी आहे, तर दुसऱ्या गटाला पाच ते सहा मजल्यांवर जागा मिळाली तरी चालणार आहे. मात्र खालचे गाळे व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे घ्यावे लागण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास व्यापारी आणि प्रशासनात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

बाजाराचे काम 2020 पर्यंत पूर्ण? 
पहिल्या चार मजल्यांपर्यंत फूल विक्रेत्यांना गाळे दिले जाणार आहे. तीन मजल्यांवर प्रत्येकी तीन हजार स्क्वेअर फुटांचे शीतगृह आहेत. ते नाशवंत वस्तूंसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित फूल बाजार उभारण्यास सुरुवातीला 2021 पर्यंतचा कालावधी निश्‍चित केला होता; मात्र, त्याला विलंब होत आहे. दोन मजल्यांना परवानगी बाकी आहे. ती मिळाल्यानंतर 2022 मध्ये हे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती प्रशासकांनी दिली. 

फूल बाजार दृष्टिक्षेपात 
अद्ययावत फूल बाजाराचे काम 
50 टक्के 

बाजार उभारणीसाठी तरतूद 
54 कोटी 

काम लांबणीवर पडल्याने वाढलेला खर्च 
100 कोटींपेक्षा अधिक 

फूल बाजारातून वर्षाकाठी मिळणारे उत्पन्न 
1 कोटी 50 लाख 

 

बाजार समिती ज्या मजल्यावर जागा देईल तिथे आम्ही व्यापार करण्यास तयार आहोत. समितीने बाजाराची लवकर उभारणी करावी. त्यामुळे बाजारात होणारी कोंडी, गैरप्रकार टळणार आहेत. 
- आप्पासाहेब गायकवाड, अध्यक्ष, फूल बाजार अडते व व्यापारी महासंघ 

फूल बाजारची नवीन बहुमजली इमारत 90 टक्के अडत्यांना मान्य नाही. फूल बाजारची सुरुवात सहाव्या मजल्यापसून होणार आहे. त्यामुळे तिथे शेतकरी कसा येईल. सर्व अडत्यांना गाळे हे खालच्या मजल्यावर हवे आहेत. 
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार अडते असोसिएशन 
 

loading image