esakal | वालचंदनगरची राधा ठरली राजगायिका

बोलून बातमी शोधा

radha khude
वालचंदनगरची राधा ठरली राजगायिका
sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : ‘चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होत वाट ’...., ‘बाजाराला विकण्या निघाली,दही दुध ताक आणि लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी’ ...,‘मल्हारी भाेळा, जीवींचा जिव्हाळा... काय सांगू त्याची मी कहाणी...’ 'तुझ्या उसाला लागल कोल्हा ’ या गाण्यांचे बोल गाऊन वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील राधा दत्तू खुडे हिच्या आवाजाने महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला असून राधाच्या आवाजाच्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. राधा खुडे हिने या आठवड्यामध्ये राजगायिका होण्याचा बहुमान पटकावला.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

वालचंदनगर जवळील शिवाजी चौकामध्ये राहणारी राधा दत्तू खुडे सर्वसामान्य कुंटूबातील साधी मुलगी आहे. आई शिला खुडे भाजी-पाला विक्रीचा स्टॉल चालवून घरी गेल्यानंतर शिलाई काम करते. तर वडिल दत्तू खुडे छोटा-मोठा व्यवसाय करुन कुंटूबाचा गाडा हाकत आहेत. राधाचे शिक्षण हे वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयामध्ये झाले. सुरवातीपासुन तिला कला,संगीत व गायनाची आवड आहे. तिने जंक्शनजवळील भारतीय कला महाविद्यालयामध्ये कला शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले आहे. राधाचा आवाज सुरेख असल्यामुळे तिची कलर्स मराठी टीव्हीच्या 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमामध्ये पाच हजार स्पर्धकांमधून निवड झाली . तिचे कलर्स मराठी या चॅनेलमधील गाणी सुरु असून तिने गायलेली चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होत वाट, बाजाराला विकण्या निघाली, दही दुध ताकआणि लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी, मल्हारी भोळा, जीवींचा जिव्हाळा... काय सांगू त्याची मी कहाणी ही गाणी लोकप्रिय झाली असून राधाच्या आवाजाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

चालू आठवड्यामध्ये तिने गायलेल्या तुझ्या उसाला लागलं कोल्हान् या गाण्यामुळे तिला राजगायिका होण्याचा बहुमान मिळाला. राधा खुडे हिला सुरवातीपासून गायनाची आवड आहे. तिने आजपर्यंत अनेक महापुरुषांच्या जयंती, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवडीने गाणी गात आहे. कलर्स मराठीच्या माध्यमातून तिला गाणी गाण्याची संधी मिळाली असून येणाऱ्या काळामध्ये राधा खुडे संधीचे सोनं करणार असून, इंदापूरचे नाव देशाच्या नकाशावर चमकणार आहे. राधाला चंदन कांबळे यांनी गायानाचे धडे दिले आहे. ग्रामीण भागातील राधा खुडे टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये गाणी गात असल्याने इंदापूर तालुक्यातील नागरिक आवर्जुन राधाचे गाण्याचे कार्यक्रम पाहू लागले आहेत.