गर्द झाडीत जमिनीत खड्डा खणून बहाद्दरांनी सुरू केला अवैध व्यवसाय

नितीन बारवकर
Tuesday, 1 December 2020

सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या धाडसी कारवाईनंतर हातभट्टी दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

शिरूर  : अण्णापूर (ता. शिरूर) येथे गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकून, जमिनीखाली लोखंडी बॅरेलमध्ये पुरून ठेवलेले दारूसाठीचे कच्चे रसायन व तयार गावठी दारू जप्त केली. ही भट्टी उध्वस्त करताना दहा हजार रूपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सोमवारी रात्री उशीरा झालेल्या या धाडसी कारवाईनंतर हातभट्टी दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

भाऊसाहेब दत्तू गिऱ्हे व बजरंग दत्तू गिऱ्हे (दोघे रा. अण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध, मानवी आरोग्यासाठी अपायकारक रसायन बनविल्याबद्दल व ते बेकायदेशीर बाळगल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

भाऊसाहेब हा बेकायदा हातभट्टी दारू तयार करायचा तर त्याचा भाऊ बजरंग हा त्याच्या मालकीच्या मॅजिक गाडीतून (क्र. एमएच १२ जीसी ९०७९) वाहतूक करायचा हे तपासातून सिद्ध झाले असून, वाहन जप्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

अण्णापूर येथे बेकायदा हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूरचे साहय़्यक पोलिस निरीक्षक गणेश उंदरे; तसेच संजय जाधव, उमेश जायपत्रे, करणसिंग जारवाल या पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्यावेळी भाऊसाहेब गि-हे हा पोलिसांना पाहून पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी परिसराची कसून तपासणी केली असता, गर्द झाडीत जमिनीत खड्डा खणून त्यात लोखंडी बॅरेलमध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचे रसायन, नवसागर, काळा गुळ असे साहित्य आढळून आले.

दरम्यान, त्यालगतच आणखी एका प्लॅस्टिकचे बॅरेलमध्ये सुमारे दोनशे लिटर कच्ची दारू व तीस कॅन भरून हातभट्टीची दारु सापडली. तयार व कच्ची दारू तसेच दारू तयार करण्यासाठीचे रसायन पोलिस पथकाने जागेवरच नष्ट केले. घटनास्थळानरून लोखंडी व प्लॅस्टिकचे बॅरेल, जर्मनचे घमेले, चाटू, प्लॅस्टिकचे कॅन आदी जवळपास दहा हजार रूपये किमतीचे साहित्य जप्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरूर परिसरातील गावठी हातभट्टी दारूधंद्यांविरूद्ध व भट्ट्यांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या असून, मानवी आरोग्यास घातक असलेले हे रसायन कुठे छुप्या पद्धतीने तयार केले जात असेल तर पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवून अशा हातभट्ट्यांवर छापे घातले जातील. दारू गाळणारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. बेकायदा गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. -प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, शिरूर

(संपादन : सागर डी. शेलार)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on liquor business in annapur village