राज ठाकरे कार्यकर्त्यांना फोनवर म्हणाले, तुमच्या आत्मचरित्राची पानं वाढली..

नितीन बारवकर
Monday, 31 August 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांची ख्याली- खुशाली विचारली व धीर दिला. "जय महाराष्ट्र' म्हणत ठाकरे यांच्या कार्यालयातून आलेल्या या फोनने आंदोलक कार्यकर्ते सुखावले.

शिरूर (पुणे) : संघर्ष कधीच संपत नसतो...जीवन जगताना आणि समाजात वावरताना चढउतार हे असतातच...काम करीत असताना त्रास होतोच; पण त्याने खचून जायचे नसते...अशा कामांतून तर व्यक्तिमत्व आणखी उजळ होत जाते...तुम्ही तावून - सुलाखून निघता, त्यावेळी नकळत तुमच्या आत्मचरित्राची पानं वाढत जातात...दस्तुरखुद्द राज ठाकरे बोलत होते अन्‌ ऐकणाऱ्याच्याच नव्हे; तर तमाम मनसैनिकांच्या अंतःकरणात बळ भरत होते, बाहुंमध्ये स्फुरण चढत होते!

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

शिरूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढीव लाईटबीले येत असल्याच्या मुद्‌द्‌यावर मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे व मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे हे "महावितरण'च्या येथील कार्यालयात गेले असताना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व त्यांच्या म्हणण्याबाबत उडवाउडवी झाल्याने संतप्त होत त्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांच्या कार्यालयात "खळ्ळ...खट्याक' केले. शासकीय कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी व शासकीय कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अटक केली. त्यानंतर शिरूर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली. येरवडा जेलमध्ये त्यांची रवानगी केली होती. 14 दिवसांच्या कारावासानंतर नुकतीच या कार्यकर्त्यांची सुटका झाली. 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

मुक्ततेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांची ख्याली- खुशाली विचारली व धीर दिला. "जय महाराष्ट्र' म्हणत ठाकरे यांच्या कार्यालयातून आलेल्या या फोनने आंदोलक कार्यकर्ते सुखावले. ठाकरे यांनी या कार्यकर्त्याचे सामाजिक आंदोलनाबद्दल अभिनंदन केले. सामाजिक काम करताना टक्केटोणपे खावेच लागतात, पण त्याने खचून जायचे नसते, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. जेलमध्ये काही त्रास झाला का, अशी विचारणाही त्यांनी आवर्जून केली व कुटुंबीयांची ख्यालीखुशालीही या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. तुम्हाला भेटायला आवडेल, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद वाढला. 
 
शहर पातळीवरील छोट्याशा आंदोलनानंतर कारावास भोगावा लागलेल्या या तरूण कार्यकर्त्यांशी खुद्द राज ठाकरे यांनी संपर्क साधल्याने व त्यांचे अभिनंदन करताना प्रेरणादायी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या संवादाची रेकॉर्ड टेप मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात व्हायरल केली असून, अविनाश घोगरे, सुशांत कुटे व रवींद्र गुळादे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray's dialogue with activists in Shirur