'पीएमपी'चे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा कसा असेल रोडमॅप; वाचा सविस्तर 

मंगेश कोळपकर
Friday, 24 July 2020

कोरोनाच्या संकटावर पीएमपी नक्कीच मात करेल; नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा असा असेल रोडमॅप 

पुणे ः कोरोनाच्या काळात पीएमपीपुढे अनेक आव्हाने आहेत. परंतु, अधिकारी, कर्मचाऱयांच्या सहकार्याने त्यावर मात करून पुणे आणि पिंपरी चिंचवडला चांगल्या दर्जाची सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असेल, असे पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी शुक्रवारी सांगितले. लॉकडाउनच्या काळात पीएमपीच्या अंतर्गत सुधारणांकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप यांची राज्य सरकारने नियुक्ती केली. नयना गुंडे यांच्याकडून जगताप यांनी दुपारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर अधिकाऱयांच्या बैठका  घेतल्या. मंगळवारपासून दोन्ही शहरांतील आगारांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जगताप म्हणाले, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पीएमपीपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. देशातील अनेक शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. ती सुरू करताना क्षमतेपेक्षा निम्मेच प्रवासी बसमध्ये घ्यावे लागतील. प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करावे लागेल. तसेच बससेवेला प्रतिसाद कसा मिळेल, याचाही आढावा घ्यावा लागेल. गेल्या चार महिन्यांत पीएमपीला मोठ्या प्रमाणात तोटा  झाला आहे. तो भरून काढतानाच पुढचे मार्गक्रमण निश्चित करावे लागले. खर्च कमी करून मनुष्यबळाचे सूसूत्रीकरण करावे लागेल. त्यावर पहिल्या टप्प्यात प्राधान्याने लक्ष दिले जाईल. तसेच पीएमपीच्या मिळकतींचा वापर करून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करावे लागतील.

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच

शहरात मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्प आहेत. त्यांच्याशी पीएमपी संलग्न करावी लागेल. त्याचे धोरण निश्चित करावे लागेल. तसेच दोन्ही शहरे विस्तारत आहेत. त्यातून पीएमपीवर अवलंबून राहणाऱया प्रवाशांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे त्यांनाही चांगल्या प्रकारची सुविधा द्यावी लागेल. तसेच पीएमपीच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रिक बस आहेत. त्यांचा वापर करून नवे प्रवासी पीएमपीकडे आकृष्ट करावे लागतील, असेही जगताप यांनी सांगितले. 

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पीएमपीच्या दैनंदिन कामकाजात करण्याची गरज आहे. त्यासाठीही उपाययोजना केल्या जातील. दोन्ही महापालिका, स्मार्ट सिटी यांच्या सहकार्याने नवे उपक्रम सुरू करण्यात येतील. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. 

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता कमी होणार

मूळचे सासवडचे असलेले जगताप भारतीय लष्कराच्या रक्षालेखा विभागाचे (आयडीईएस) अधिकारी आहेत. प्रतिनियुक्तीवर ते सध्या महाराष्ट्रात आहेत. या पूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी  कारकिर्द पूर्ण केली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Jagtap is the newly appointed president of PMP