कर्जमाफीची होर्डींग लावून जनतेची फसवणूक : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

निंबुत (ता. बारामती) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी कर्जमाफीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोमेश्वरनगर : कर्जमाफी तकलादू असतानाही होर्डींग लावून 'आम्ही करून दाखवलं...' अशी फसवणूक केली जात आहे. 'सातबारा कोरा केला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही' असं अजितदादा बोलले होते. तेच वित्तमंत्री झालेत. त्यांनी शब्द पाळावा. जयंत पाटलांनी कर्जमाफीसाठी एकतीस हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते. परंतु सध्याच्या निकषांनी ते पैसे शेतकऱ्यांना द्यायचे नाहीत हे सिध्द होते. तुमचा हेतू स्वच्छ नाही, असा घरचा आहेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

निंबुत (ता. बारामती) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी कर्जमाफीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिकला 61 कोटी, कोल्हापूरला 225 कोटी, सांगलीला 300 कोटी येतात. मोठ्या बँकांना एवढेच पैसे येणार असतील तर राज्यात आठ हजार कोटींपेक्षा जास्त मिळणार नाहीत. एकतीस हजार कोटींचा आकडा खोटा किंवा तुमचे निकष तरी खोटे. आम्हाला विचारा आम्ही एकतीस हजार कोटीत शेतकऱ्यांना समाधानी कसे करता येईल ते सांगतो. 'सातबारा कोरा' यावर स्वाभीमानी ठाम आहे. राज्यावर कर्ज असल्याने सध्या पीककर्ज संपवा आणि चार वर्षात मध्यम मुदत संपवा. पण फसवणूक करू नका, अशी टीका शेट्टी यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रूपये द्यावेत या मागणीशी ठाम आहोत. परंतू सद्यस्थितीत पैशाची उपलब्धता नसल्याने एकरकमी एफआरपी आणि कारखाने बंद होताना दोनशे अशी सवलत दिली आहे. मात्र जे एकरकमी एफआऱपी देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी करण्यासाठी साखरआयुक्तांवर दबाव आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

मागील सरकारच्या गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे भाकड गाई, बैल सांभाळावे लागतात. माणसाला खायला नाही जनावरं किती दिवस सांभाळायची? खरेदी-विक्रीदार, चामडे व्यवसायाचा रोजगार संपला आहे. दुसरीकडे भारतच सर्वाधिक मांस निर्यात करतो हा विरोधाभास आहे. यात बदल करण्याचे सूतोवाच शेट्टी यांनी केले. तसेच 'जेएनयू'वर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन

सत्तेच्या वाट्याची अपेक्षा नव्हतीच
भाजपच्या साम्राज्यवादी व जातीत तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून महाविकासआघाडीला पाठींबा दिला होता. प्रमुख तीन पक्षांची बेरीज 154 होत असल्याने आम्हाला वाट्याची अपेक्षा नव्हतीच. मी वा कुणीही तशी मागणी केली नसताना माध्यमातून चर्चा का घडविली? घटकपक्षाच्या कुठल्याही नेत्याला मंत्रीमंडळ विस्ताराचं निमंत्रणही दिलं नाही याबाबत आक्षेप आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत पूर्ण ताकदीने ते मांडू, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty Criticizes Government on Farmers Issue