बारामतीत मोर्चा काढण्यामागे राजू शेट्टी यांनी दिले हे कारण

मिलिंद संगई
Thursday, 27 August 2020

राज्य सरकारने दुधास 27 रुपये भाव द्यायला हवा व दुध भुकटी आयातबंदी केली पाहिजे, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत आज मोर्चा काढण्यात आला.

बारामती (पुणे) : दुधाच्या दराचा प्रश्न होण्यास प्रामुख्याने लॉकडाउन व पर्यायाने केंद्र सरकारच कारणीभूत आहे. लॉकडाउन झाले नसते, तर गायीच्या दुधाचा भाव किमान चाळीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असता. लॉकडाउन झाल्याने दुधाचा खप चाळीस टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे दुधाचे भाव पडले, जर केंद्राच्या लॉकडाउनमुळे दुध उत्पादकांचे नुकसान होत असेल, तर सर्वात आधी केंद्राने मदतीसाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश
 
राज्य सरकारने दुधास 27 रुपये भाव द्यायला हवा व दुध भुकटी आयातबंदी केली पाहिजे, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत आज मोर्चा काढण्यात आला.  त्यावेळी शारदा प्रांगणात माध्यमांशी बोलतांना राजू शेट्टी यांनी ही भूमिका बोलून दाखवली. केंद्राने वास्तविक मदतीसाठी पुढे यायला हवे होते, प्रत्यक्षात केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून दुध उत्पादकांच्या वाट्याचे जवळपास दीडशे कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

दुध दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चांची मालिका सुरु केली असून, प्रत्येक जिल्ह्यात एक मोर्चा काढला जात आहे. यात सोलापूर, नगर, सातारा येथे मोर्चे झाले आहेत. पुणे जिल्ह्याचा मोर्चा बारामतीत काढला आहे. पुण्याची कोरोनाची स्थिती व तेथे जनावरे घेऊन जाणे अवघड असल्याने आम्ही बारामतीत मोर्चाचे नियोजन केल्याचे राजू शेट्टी म्हणाले. उस्मानाबादचाही मोर्चा भूम येथील प्रांत कार्यालयावर नेणार आहे, केवळ बारामती म्हणून येथे मोर्चाचे नियोजन केले नसल्याचाही खुलासा त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty demands central government to help milk farmers