पवारसाहेबांच्या बारामतीतील शेती शाळेत रमले राजू शेट्टी

मिलिंद संगई
Tuesday, 16 June 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील विकसीत शेतीची सफर घडवली.

बरामती (पुणे) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील विकसीत शेतीची सफर घडवली. स्वत: पवार यांनी त्यांना आपल्या गाडीतून बारामती पंचक्रोशीतील शेतीसंदर्भात सुरु असलेल्या विविध प्रयोगांबाबत सविस्तर माहिती दिली. या ठिकाणी सुरु असलेले शेती विकासाचे काम पाहून राजू शेट्टी प्रभावित झाले होते. 

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना शरद पवार व राजू शेट्टी यांनी आज भेट दिली. देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी गिर, साहिवाल, खिलार, पंढरपुरी, मुर्रा म्हैस या देशी जनावरांसंबंधी संशोधन कार्य येथे होतं. खासदार सुप्रिया सुळे, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण यांच्यासह इतरही अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

पवार- शेट्टी यांच्यात मैत्रीचा धागा गुंफण्यामागे आहे हा हात...  

ट्रस्टने राष्ट्रीय कृषी योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या डेअरी प्रकल्पामार्फत दुधाची, रक्ताची तपासणी, चाऱ्याची तपासणी तसेच पशुपालनाचे प्रशिक्षण दिलं जातं. येथे शेण, गोमूत्र आणि दुधावर मूल्य संवर्धन प्रक्रिया केंद्रही येथे उभारलं जात आहे. नेदरलँडच्या तंत्रज्ञानावर आधारलेले भाजीपाला गुणवत्ता केंद्र आहे. ही उत्तम वाणाची रोगप्रतिकारशक्ती असलेली भाजीपाल्याची रोपं ना नफा ना तोट तत्त्वावर शेतकऱ्यांना विकली जातात. या रोपांमार्फत अधिक उत्पादन काढण्यासंबंधी कन्सल्टन्सीही येथे केली जाते. एवढंच नाही तर झालेल्या उत्पादनाचं ग्रेडिंग करून निर्यात वा स्थानिक बाजारपेठेत विक्रीव्यवस्थेचं मार्गदर्शनही केलं जातं. राज्यभरातील शेतकरी इथल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतात. ब्राझिलच्या जातीपासून एम्ब्रियोमार्फत तयार केलेल्या कालवड प्रकल्पाल आहे. 

राजू शेट्टींचा निर्णय झाला...राष्ट्रवादीच्या कोट्यातून होणार आमदार

या प्रकल्पांना आणि नेदरलँडशी सामंजस्य करार असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक्रम राबवणाऱ्या अॅग्रीकल्चरल कॉलेजलाही राजून शेट्टी यांनी भेट दिली. नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली. येथे फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी सुरु असलेले शेती विकासाचे काम पाहून राजू शेट्टी प्रभावित झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty's agricultural trip to Baramati with Sharad Pawar