esakal | या भक्तगणांना आवरणार कोण?

बोलून बातमी शोधा

पुणे - रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक गर्दी असलेली रात्रीची वेळ.. मंदिरासमोर रस्त्याच्या मध्येच दुचाकी थांबवून दर्शन घेणारा तरुण.. मास्क नाकाखाली ओढून मोबाईल फोनवर मूर्तीचे छायाचित्र घेणारा घोळक्‍यातील ‘भाविक’... गर्दीत ‘सोशल डिस्टन्सिंग’चा उडालेला फज्जा... }

‘कोरोना’बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढू लागली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर लोकांनी सुरक्षाविषयक नियमांकडे केलेले दुर्लक्ष, हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. ‘त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर लॉकडाउन अधिक कडक करण्यात येईल,’ असा इशारा सरकारने दिला आहे.

या भक्तगणांना आवरणार कोण?
sakal_logo
By
रमेश डोईफोडे

‘कोरोना’बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढू लागली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर लोकांनी सुरक्षाविषयक नियमांकडे केलेले दुर्लक्ष, हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. ‘त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर लॉकडाउन अधिक कडक करण्यात येईल,’ असा इशारा सरकारने दिला आहे. त्यावर पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद कसा आहे?.. अंगारकी चतुर्थीला (ता. २ मार्च रोजी) शहरात जे अनुभवास आले, त्यावरून ‘हम नहीं सुधरेंगे’चे धोरण अनेकांनी अद्याप सोडले नसल्याचे दिसते. त्यांची ही बेफिकिरी शहराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. 

उद्देश असफल
‘अंगारकी’ला गणपती मंदिर बंद ठेवण्यात येईल, असे शहरातील, तसेच ग्रामीण भागातील प्रमुख देवस्थानांनी आधीच जाहीर केले होते. एरवी दर चतुर्थीला सर्वच गणेश मंदिरांत भाविकांची गर्दी जास्त असते. ‘अंगारकी’ला तर तीत आणखी वाढ होते. या पार्श्‍वभूमीवर विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन, संबंधित विश्‍वस्तांनी त्या दिवसापुरती ‘देऊळबंद’ची घोषणा केली. हे स्वागतार्ह पाऊल होते. तथापि, अनेक ठिकाणी उक्ती आणि कृतीत अंतर पडल्याने गर्दी टाळण्याचा उद्देश सफल झाला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गर्दीच्या धोक्याकडे दुर्लक्ष
अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवानंतर उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी रस्त्यानजीक जागा मिळवल्या आहेत. त्यांपैकी काहींना मंदिरांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे भाविकांची कमी-अधिक वर्दळ तेथे नेहमीच असते. एखाद्या व्रताप्रमाणे चतुर्थीला आरतीसाठी हमखास हजेरी लावणारे अनेकजण आहेत. परिस्थिती सर्वसाधारण असताना ही श्रद्धा जपणे समजू शकते; पण ‘गर्दी हाच पहिला धोका’ असे वातावरण असताना, सुरक्षा नियम धुडकावून लावणे स्वाकारार्ह होऊ शकत नाही. गेल्या गणेशोत्सवात हेच घडले. कोणत्याही मंडळाने नेहमीसारखे भव्य-दिव्य देखावे, सजावट केली नसताना लोकांच्या झुंडी अकारण मुख्य रस्त्यांवरून इकडे-तिकडे फिरत होत्या. त्यांच्या या अतिउत्साहाचा परिणाम नंतर बाधितांची संख्या वाढण्यात झाला. 

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने कोरोना उपचार केंद्र पुन्हा होणार सुरू

विसंगतीचे दर्शन
हा पूर्वानुभव गाठीशी असताना त्यातून कोणताही धडा घेतला जात नाही, हे खेदजनक आहे. मंगळवारी दर्शनेच्छुकांच्या गर्दीचा जो अतिरेक झाला, त्याला आपणही जबाबदार आहोत काय, याचा विचार मंदिर व्यवस्थापनांनी करायला हवा. एकीकडे देवालय बंद राहील, असे सांगायचे आणि दुसरीकडे मूर्तीचे मुखदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करायची, त्यासाठी बाहेर रांग लावायची, दक्षिणा स्वीकारण्यासाठी दानपेटी ठेवायची, परिसरात रोषणाई, सजावट करायची... याची संगती कशी लावायची? म्हणजे मंदिर तांत्रिकदृष्ट्या बंद; पण बाकी सारे नेहमीप्रमाणे चालू! ही एकप्रकारची दिशाभूल आहे. 

परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली

आरतीच्या वेळी लोकांच्या गर्दीमुळे निम्मा रस्ता बंद, हे जणू कायमचे दृश्‍य झाले आहे. त्यावेळी मास्कचा वापर, ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे सगळे नियम देवाच्या साक्षीने धाब्यावर बसवले जातात. त्याबद्दल आपल्यावर कारवाई होईल, ही चिंता कोणालाही नसते. कारण तेव्हा पोलिस आसपास असले, तरी धार्मिक विषयात आपण कशाला पडायचे, असा सावध पवित्रा घेऊन ते गप्प राहणे पसंत करतात. या सगळ्याचे सार्वजनिक आरोग्यावर कोणतेच परिणाम होत नसतील का? 

वाहनचालक दर्शनार्थी
काही ‘भाविकां’चे वर्तन तर अपघातांना आमंत्रण देणारे असते. ही मंडळी रस्त्यावर रहदारी सुरू असताना दर्शन घेण्यासाठी मंदिरापुढे स्वतःचे वाहन अचानक थांबवतात. पाठीमागून वेगात येणारे वाहन आपल्याला ठोकरू शकते, याचे भान त्यांना नसते. इतर वाहनचालकांनी हॉर्न वाजवून त्यांची दर्शनसमाधी भंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते लवकर दाद देत नाही. परिणामी, वाहतुकीची कोंडी आणखी वाढते. गंभीर बाब म्हणजे, या पद्धतीचे दर्शनार्थी अपवादात्मक नसून, त्यांची संख्या काळजी वाटावी इतकी जास्त आहे ! 

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक
 
‘नजर हटी, दुर्घटना घटी’
काही जण त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर दिसणाऱ्या प्रत्येक मूर्तीपुढे नतमस्तक होऊ इच्छित असतात. सगळीकडे थांबणे शक्‍य नसल्याने त्या ठिकाणी आल्यावर आपल्या चारचाकी वा दुचाकी वाहनाचा वेग कमी करून मान तुकवणे, विशिष्ट प्रकारे हात हलवून (त्यांच्या दृष्टीने) वंदन करणे या प्रकारे ते आपला भक्तिभाव प्रगट करीत असतात. यात किमान काही क्षणांसाठी तरी त्यांचे रस्त्यावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष होते. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ हा सावधानतेचा इशारा तेव्हा त्यांच्या गावीही नसतो. दुर्लक्षाचे हे काही सेकंद त्यांच्या किंवा इतरांच्या जिवावर बेतू शकतात. अशी ‘भक्ती’ काय कामाची? 

व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची वा पंथाची असो, तिची व्रतवैकल्ये, धर्माशी निगडित अन्य बाबी हे सर्व वैयक्तिक विषय आहेत. त्यानुसार आपले आचरण ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, हे करताना अन्य कोणाला उपद्रव होणार नाही, सार्वजनिक नियमांचे, कायद्यांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारीही सर्वांवर आहे. ‘कोरोना’ महाविध्वंसक असल्याने या काळात तर सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. त्याला न जुमानता बेफिकिरीने वागणाऱ्या व्यक्तीला त्याची श्रद्धा असलेले जगातील कोणतेही ‘दैवत’ वाचवू शकणार नाही, हे वास्तव आहे. कारण याबाबतीत निसर्गाचा एक कठोर नियम आहे. - चुकीला माफी नाही!

Edited By - Prashant Patil