'...तर महाविद्यालयांची मान्यता काढू'; रखडलेल्या प्राध्यापक भरतीवरून 'यूजीसी'चा इशारा!

Professors
Professors

पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत तब्बल चार हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी निर्देश देऊनही शासनाने ही पदे भरलेली नाहीत. यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांना याबद्दल विचारले असता त्यांनी अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार युजीसीकडे असल्याचे स्पष्ट केले. परंतु, आजवर त्याचा वापर करण्यात आला नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने प्राध्यापकांची पदे न भरणाऱ्या महाविद्यालयांची मान्यताच काढून घेतली आहे. तसेही यूजीसी करू शकते, अस नकळत इशारा डॉ. पटवर्धन यांनी दिला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नव्या शैक्षणिक धोरणासह संशोधन, प्राध्यापक भरती, बदलती शिक्षण पद्धत आदी गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. प्राध्यापक भरतीचा प्रश्‍न उपस्थित केले असता त्यांनी वरील मत प्रदर्शित केले. महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी प्राध्यापक भरतीसाठी परिपत्रके पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. असे असूनही आजही चार हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत मारक गोष्ट आहे. प्राध्यापकांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सक्षम व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

'लाखो'ची प्राध्यापक भरती :
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये लाखो रुपये घेऊन प्राध्यापकांची पदे भरली जातात. हे उघड सत्य आहे. यासंबंधी डॉ. पटवर्धन यांना त्यांचे मत विचारले असता राज्य शासनाने प्राध्यापक भरती अधिक सक्षम आणि पारदर्शक करणे गरजेचे असल्याचे म्हटले. यासाठी आम्हीही सातत्याने प्रयत्न करत असून हा विषय खूप दिवस लावून धरावे लागणार असल्याचेही त्यांनी चर्चा करताना म्हटले. 

राज्यातील महाविद्यालयांमध्ये अवैध प्रकारे पैसे घेऊन होणारी ही भरती शिक्षणव्यवस्थेला मोठी कीड असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र उघडपणे त्यावर ना प्राध्यापक बोलतात न उमेदवार! यामुळे राज्यातील एका अख्ख्या पिढीचेच नुकसान होणार आहे. राज्यातील बहुतेक महाविद्यालये आणि शिक्षण संस्था राजकीय लोकांच्या अखत्यारीत असल्याने अशा भरतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे अनेक उमेदवारांनी दुसऱ्या राज्याची वाट धरल्याचे पाहायला मिळत आहे. नेट, सेट, पीएचडी धारक अनेक उमेदवार गोवा, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये लेक्चरर म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यूपीएससी अंतर्गत येणारी पदे, तसेच ज्या राज्यात राज्य लोकसेवा आयोग परीक्षा घेते अशा ठिकाणी उमेदवार अर्ज करत आहेत. तर काही हुशार विद्यार्थी खासगी कंपनी आणि क्‍लासेसकडे जात आहे. वाढते वय, लग्न आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्याने उमेदवारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे. पण राज्यातील रखडलेली प्राध्यापक भरती लवकर मार्गी लागावी, अशी इच्छा अजूनही असल्याचे उमेदवारांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com